Take a fresh look at your lifestyle.

नुसत्या आर्थिक सुबत्तेने सुखी होता येत नाही !

मग जगात दुःखच पाहायला मिळालेच नसते.

आपण आर्थिक स्थिती आणि सुख दुःखाचा सतत संबंध लावतो.वरवर पहाता तसं वाटणं चुकीचं नाही. पण या गैरसमजातुन बाहेर पडता आले पाहिजे.एका खानाच्या मुलाचं जीवन काय आहे हे आपण पाहतो आहोत.हे सगळं पैशामुळं होतय असं म्हटलं तर चुकीचं होईल.
सुसंस्काराशिवाय आलेली श्रीमंती सगळं संपवण्यासाठी पुरेशी ठरते.ती धनलक्ष्मी न ठरता अवधसा ठरते.भौतिक सुखाची रेलचेल म्हणजेच आजारांचं निवासस्थान आहे. एक साधा प्रश्न आहे की शरीराचे लाड कोण करु शकतो?ज्याच्याकडे मुबलक धन उपलब्ध आहे तोच त्या गोष्टी करु शकतो.म्हणजे अगदी सकाळी उठल्यावर साबण,शँपु, डिवोड्रंट,पावडर,शेविंग क्रिम,अफ्टर शेव लोशन,टुथपेस्ट, फेसपॅक,परफ्युम स्रीयांची मेकपपेटी हे सगळं आता आवश्यक झालं आहे.
दैनंदिन काम करणारा वर्ग यातलं साबन,टुथपेस्ट सोडता काहीच वापरु शकत नाही. पण त्याने त्यांचं काही अडत नाही हे ही खरं आहे. झोपायला एक गोधडी,कांबळ चालते पण सुबत्ता त्यावर झोपु देत नाही.आपण हे बदलावं असं नाही. पण सुबत्तेने गरज नसलेली रसायणं खरेदी करुन अंगाला चोळताना एकदा तरी विचार यायला हवा.नाश्त्याला आता कांदापोहे चालत नाहीत.त्याची जागा टोस,खारी,मँगी,बर्गर,पिझ्झा,पास्ताने घेतली आहे. पण त्यामुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम कोण मोजतो?सुबत्तेने आळशीपणा वाढत चालला आहे.त्यामुळे शरीर रोगी होत आहे.हे जाणून नित्य व्यायाम करणारी सुज्ञ मंडळी व्याधींपासुन वाचतात.
शारीरिक कष्ट करणारांना वेगळा व्यायाम करण्याची गरज भासत नाही.हे झालं शरीर शास्र.पण दिवसभराच्या धकाधकीत मन प्रसन्न ठेवता येणं हेच खरं श्रीमंतीचं लक्षण आहे असं मी म्हणेल.त्यासाठी परिस्थिती आडवी येत नाही. विचारधन जवळ असणं म्हणजे श्रीमंती आहे. आर्थिक परिस्थिती सुधारली म्हणजे सुखी जगता येईल या भ्रमातुन बाहेर आले पाहिजे. आर्थिक स्थिती मजबूत करणे हा तर पुरुषार्थ आहे.पण तो आनंद घेण्यासाठी शरीर निरोगी असायला हवे आणि त्यासाठी पहिल्यांदा मन निरोगी असले पाहिजे.
संतानी मन प्रसन्न ठेवण्यावर भर दिला आहे. कारण जगण्याची ऊर्जा मन निर्माण करतं.आत्महत्येपर्यंत घेऊन जाणारं मनच आहे.आणि संकल्प पुर्ण करण्याची हिम्मत ठेवणारही मनच आहे. कितीही महागड्या गाडीत फिरता आले तरी मनाला नेहमी जमिनीवर चालण्याची सवय ठेवली पाहिजे.मग सुबत्ता व्यसनापर्यंत जाऊ देणार नाही. कुणावर अन्याय करणार नाही आणि होऊही देणार नाही.आता कुणी गरीब पहायला मिळत नाही हे खरं आहे पण विचारांची श्रीमंती कमी होत आहे हे ही वास्तव आहे.आपल्यासह पुढच्या पिढीला आम्ही या श्रीमंतीबरोबर ती श्रीमंती देऊ शकलो तर निरोगी रहाण्याचं भाग्य त्यांच्या वाट्याला निश्चित येईल.
रामकृष्णहरी