पारनेर : राज्यात कोरोना बाधितांची संख्या घटत चालली असली तरी नगर जिल्ह्यात विशेषता: पारनेर व संगमनेर तालुक्यातील रुग्ण संख्या कमीच होत नव्हती त्यामुळे प्रशासनाचीही डोकेदुखी वाढली होती मात्र, जिल्ह्यासह या दोन्ही तालुक्यात आज दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. पारनेर व संगमनेर तालुक्यातील रुग्ण संख्येत आज मोठी घट झाल्याने ही दोन्ही तालुके आता कोरोना मुक्तीच्या वाटेवर आहेत. मात्र तरीही नागरिकांनी निर्बंध पाळून काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
नगर जिल्ह्यातील वाढती कोरोना बाधितांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी ज्या गावात दहा पेक्षा जास्त कोरोना बाधित आहेत अशा गावात लॉकडाऊन केला होता. पारनेर तालुक्यातील जामगावला सलग तिसऱ्यांदा लॉकडाऊन करण्यात आला. तर वासुंदे गावही बंद आहे. प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाचा परिणाम हळु हळु दिसू लागला आहे. आज (सोमवारी ) जिल्ह्यात फक्त 163 कोरोना बाधित रुग्ण आढळले. यामुळे नगर जिल्ह्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे होत असल्याचे स्पष्ट दिसू लागले आहे.
काही दिवसापुर्वी संगमनेर, पारनेरच्या आकडेवारीमुळे चिंता वाढली होती. मात्र आज पारनेर 13 तर संगमनेर 12 असे रुग्ण आढळल्याने समाधान व्यक्त होत आहे. त्याचप्रमाणे नऊ ठिकाणही आकडेवारी दहा पेक्षा कमी असून सर्वाधिक असलेल्या राहुरीची आकडेवारी 21 वर आहे.
आज सोमवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 21, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 105 तर अँटीजेन चाचणीत 37 असे 163 कोरोना बाधित आढळून आले.
आजची तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे -राहुरी 21, राहाता 19, नगर ग्रामीण 17, कोपरगाव 14, नगर शहर 13, पारनेर 13, संगमनेर 12, इतर जिल्हा 9, पाथर्डी 9, श्रीगोंदा 8, नेवासा 7, शेवगाव 6, अकोले 5, जामखेड 4, कर्जत 3, श्रीरामपूर 3 असे कोरोना बाधित आढळून आले.