शिरूर : शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांना एका निनावी पत्रातून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे संपूर्ण शिरूर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. या पत्रामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मात्र चांगलेच आक्रमक झाले आहेत.
या निनावी पत्रातून आमदार अशोक पवार यांच्यासह त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असून त्याचबरोबर या पत्रात उद्योजक प्रकाश धारिवाल यांचा ही उल्लेख करण्यात आला आहे. काही वर्षांपूर्वी शिरूर शहरात हत्या झालेल्या नगरसेवक महेंद्र मल्लाव यांचा दाखला या पत्रात देण्यात आला आहे.
“आमचे नेते अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली शिरूर शहराचा चांगल्या प्रकारे विकास चालू आहे, तो काही समाजकंटकांना चांगला वाटत नाही, त्यामुळे त्यातून असं केवळ नैराश्यपोटी हे कृत्य करण्याची ते भाषा वापरतात. याचा मी जाहीर निषेध करतो. याच्या पाठीमागे कोण आहे? याचा शोध गृहखात्याने घ्यावा अशी विनंती करतो.” असे आमदार अशोक पवार यांनी सांगितले.
दरम्यान या प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ही चांगलेच आक्रमक झाले आहेत गृहखात्याने तातडीने आमदार अशोक पवार आणि त्यांच्या कुटुंबियांना झेड सुरक्षा व्यवस्था पुरवावी, अशी मागणी या कार्यकर्त्यांनी केली आहे.