Take a fresh look at your lifestyle.

माळकुपमध्ये आदिवासींसाठी साकारणार अद्यावत आदर्श वसाहत !

शासनस्तरावर मदत करण्याचे आ.लंके यांची आश्वासन.

पारनेर : तालुक्यातील माळकुप येथे अनुसूचित जमातीच्या नागरीकांसाठी शबरी घरकुल योजनेअंतर्गत सुमारे 80 घरांची अद्यावत वसाहत लवकरच स्थापन होणार आहे.या वसाहतीसाठी सर्वतोपरी मदत करून माळकुपची वसाहत आदर्श मॉडेल करणार असल्याचे ग्वाही आमदार निलेश लंके यांनी दिली.
तालुक्यातील माळकुप येथे अनुसूचित जमातींची मोठी संख्या आहे अनेक वर्षांपासून या आदिवासी बांधवांच्या निवाऱ्याचा प्रश्न कायम आहे. माळकुप येथील युवा सरपंच संजय काळे यांनी पाठपुरावा करून ही वसाहत साकारण्याची आशा निर्माण झाली आहे. यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांनी माळकुप येथे नुकतीच भेट देऊन आदिवासी बांधवांबरोबर वसाहती संदर्भात चर्चा करून जागेची पाहणीही केली.

शबरी, रमाई तसेच पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत याठिकाणी अद्यावत वसाहत निर्माण करण्यात येणार असून रस्ते, पाणी, वीज या सुविधाही तयार करण्यात येणार असल्याचे सांगत श्री.भोर म्हणाले की, यासाठी पात्र लाभार्थ्यांना आधारकार्ड, रेशन कार्ड व जातीच्या दाखल्याची आवश्यकता आहे या सर्व कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी लवकरच गावातच कॅम्प लावण्यात येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे घरकुलांच्या जागेसंदर्भात प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. पात्र लाभार्थ्यांनी एकोपा व समन्वय साधल्यास माळकुप येथे आदर्श वसाहत निर्माण होईल असा विश्वास व्यक्त करीत याकामी आपण सरकारी पातळीवर सर्वतोपरी मदत करणार असल्याचे भोर यांनी सांगितले.

प्रास्ताविकात सरपंच संजय काळे यांनी या वसाहतीची माहिती देऊन गावातील विविध प्रश्नही मांडले. आदिवासी बांधवांना घरकुलासाठी शासकीय जागा उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे सरपंच काळे यांनी सांगितले.
यावेळी गटविकास अधिकारी किशोर माने, कैलास लांडे यांचीही भाषणे झाली. दरम्यान माळकुप येथील वसाहतीसाठी राज्य शासन स्तरावर सर्वतोपरी मदत करून एक आदर्श मॉडेल वसाहत निर्माण करण्यासाठी आपण स्वतः पुढाकार घेणार असल्याचे आश्वासन आमदार निलेश लंके यांनी सरपंच संजय काळे यांच्याशी बोलताना दिले.

यावेळी उपसरपंच राहुल घंगाळे, माजी सरपंच बबन शिंदे,बाळासाहेब शिंदे, लहू गांगुर्डे, अरुण गवळी, सखाराम नाबगे, ग्रामविकास अधिकारी हरिभाऊ येवले, रंगनाथ गांगुर्डे मंजाबापू शिंदे,रेश्मा ठाणगे,कामगार तलाठी श्रीमती गोल्हार आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्राथमिक शिक्षक अनिल शिंदे यांनी केले.
आदिवासींच्या घरकुलांसाठी आदर्श वसाहत उभारण्यासाठी सुपे औद्योगिक वसाहतीमधील अनेक कारखानदारांशी त्यांचा सीएसआर फंड मिळविण्यासाठी आपण चर्चा केली आहे. तो निधी उपलब्ध झाला, तर राज्यात आदर्श अशी आदिवासींसाठीची घरकुल वसाहत तालुक्यात उभारणार आहोत.
आमदार निलेश लंके