Take a fresh look at your lifestyle.

राहुल झावरे हा ‘लंबी रेस का घोडा आहे!’ 

'झेडपी' च्या उमेदवारीवर राज्यमंत्र्यांची मार्मिक टिप्पणी !

पारनेर : वनकुट्याचे लोकनियुक्त सरपंच अॅड.राहुल झावरे यांनी सरपंचपदाच्या माध्यमातून गावच्या विकासासाठी कोट्यवधींची कामे करून आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. त्यामुळेच आगामी जिल्हा परिषदेची उमेदवारी त्यांना देण्याची मागणी विविध वक्त्यांनी एका समारंभात केली. यावर राहुल हा लंबी रेस का घोडा आहे अशी मार्मिक टिप्पणी आदिवासी व उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केली.

अगदी सर्वसामान्य कुटूंबातून राहुल झावरे यांचे नेतृत्त्व पुढे आले आहे. प्रतिकुल परिस्थितीशी सामना करीत त्यांनी राजकिय संघर्ष केला आला.आदिवासी बहूल असणाऱ्या वनकुटे व परिसरातील गोरगरीब जनतेसाठी त्यांनी मोठे काम केले आहे.आमदार निलेश लंके यांचे विश्वासू सहकारी अशी त्यांची ओळख आहे. राहुल झावरे यांनी कोरोनाकाळात आ. लंके यांच्या खांद्याला खांदा लावून काम केले आहे.

वनकुटे येथे आमदार लंके, राज्यमंत्री तनपुरे यांच्या उपस्थितीत विविध विकासकामांचा भुमिपुजन समारंभ नुकताच पार पडला. यावेळी सरपंच राहुल झावरे यांच्या कामाची दखल घेवून त्यांना जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणूकीत उमेदवारी देण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्यासह विविध वक्त्यांनी केली.

‘त्यावर आमदार निलेश लंके यांनी अजून पुलाखालून बरेच पाणी जायचे आहे, ज्याच्याकडे मेरीट आहे, त्याला उमेदवारी दिली जाईल, असे सावध वक्तव्य केले. तोच धागा पकडून राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी राहुल हा लंबी रेस का घोडा आहे, असे सांगत तो स्पर्धेत कमी पडणार नाही, अशी खात्री व्यक्त केली. झावरे यांच्यावर पैसे लावा, मित्रासाठी माझ्या शिफराशीचा विचार करा, असे तनपुरे म्हणताच उपस्थितांनी टाळ्या वाजवून दाद दिली.