Take a fresh look at your lifestyle.

योगायोग : बर्थ डे जागतिक भुलशास्त्र दिवसाचा आणि भूलतज्ज्ञांनाचाही !

डॉ.बाळासाहेब बांडे : एक थक्क करणारा प्रवास..

✒️ गीताराम म्हस्के

आज 16 ऑक्टोबर ,जगभर “जागतिक भूलशास्त्र दिवस ” म्हणून साजरा केला जातो.
त्या निमित्त भूलशास्त्रा संबंधात असणारे समज गैरसमज यांचा उहापोह करुन भूलशास्त्र या महत्वपूर्ण विषयाचे अनन्यसाधारण महत्व जनसामान्यांसमोर यावे म्हणून हा लेखन प्रपंच.
“अनेस्थेशिया” या शब्दाची निर्मिती ग्रीक शब्दापासून झाली आहे.याचा अर्थ “लॉस ऑफ सेंसेशन” म्हणजे “संवेदना विरहित” असा आहे.
1846 साली “ऑलिव्हर वेंडेल होम्स ” ने अनेस्थेशिया म्हणजे भूलशास्त्र हे एक असे शास्त्र आहे ज्यामध्ये शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णांना गुंगी येणारी(हिप्नोसिस) औषधे देऊन त्यांची शस्त्रस्क्रिये संदर्भातील स्मृती जाऊ शकते (अम्नेसिया) आणि वेदना रहित शस्त्रक्रिया शक्य होवू शकते असे सर्वप्रथम म्हणणे मांडले.
16 ऑक्टोबर 1946 रोजी “विलियम टी जी मॉर्टन “यांनी मेसाचुसेटस हॉस्पिटल येथे “ईथर” ह्या औषधाचा वापर करून एका रुग्णाचा दात वेदना विरहित काढण्यात यश मिळवले आणि तो जगातील पहिला यशस्वी अनेस्थेशिया ठरला.त्यानंतर आजतागायत भूलशास्त्र या विषया मध्ये अविश्वसनीय बदल झाले आहेत .मॉनिटरिंग (रुग्णा वर देखरेख) करण्याच्या अनेकविध नवीन पद्धतींचे संशोधन होऊन रुग्णांसाठी अतिशय सुरक्षित अशी भूल देता येणे शक्‍य झाले आहे.

 

सध्या भूल शास्त्राची अनन्यसाधारण प्रगती होऊन त्याच्या कक्षा चहूबाजूंनी विस्तारल्या आहेत.
आता भूल शास्त्र म्हणजे फक्त भूल देणे असे नसून शस्त्रक्रियेदरम्यान, आधी आणि नंतर रुग्णाला सर्व प्रकारे उपचार देऊन, गंभीर आजारांचे निदान करून, आय सी यु मधील रुग्णांची काळजी घेणे, कार्डिओ पल्मनरी रिससिटेशन म्हणजे अतिगंभीर रुग्णाचे हृदय बंद पडल्यास ते चालू करण्यासाठी पुढाकार घेणे,ट्रॉमा रिससिटेशन म्हणजे अपघात झाल्यानंतर रुग्णाचे हृदय, फुफ्फुस, रक्तदाब यांची काळजी घेणे असा आहे.
त्यामुळे भूल शास्त्र या विषयाची माहिती घेणे ही आता आधुनिक काळाची गरज बनली आहे.
आत्ता पर्यंत शस्त्रक्रिया कोणता डॉक्टर करतोय, त्यापूर्वी त्यांनी केलेल्या किती शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या; याबाबत रुग्ण व त्याचे नातेवाईक रीतसर चौकशी करून खात्री करून घेत असताना आपल्याला दिसतात, परंतु भूल देण्यासाठी कोण येणार आहे? हे किती रुग्ण विचारत असतात किंवा त्यांना त्याबाबत किती ज्ञान असते ही सुद्धा विचार करण्यासारखी गोष्ट आहे.
भूलतज्ज्ञ हा निर्धोक शस्त्रक्रियेतील यशामागचा महत्वपूर्ण आणि समान भागीदार आहे पण असे असताना किती वेळा रुग्ण आणि समाज त्याचे योगदान समजून घेतात?
वास्तिविक शस्त्रक्रियेवेळी सर्जन इतकीच भूलतज्ज्ञांची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची असते. आजकाल जवळजवळ प्रत्येकाला त्याच्या आयुष्यात कधी ना कधी भूलतज्ज्ञाशी काम पडतेच; परंतु असे असतानाही बऱ्याच वेळा भूलतज्ज्ञ पडद्या आडचा कलाकार असतो असे चित्र आपल्याला दिसते .
कोणतीही शस्त्रक्रिया करताना सर्जनचे म्हणजेच शल्यचिकित्सकाचे लक्ष पूर्णपणे निश्चित असतेच,परंतु भूलतज्ज्ञ हा रुग्णाच्या शारीरिक हालचालींवर तसेच रुग्णाचे व्हाईटल पॅरामीटर्स म्हणजे नाडीचा दर ,रक्तदाब ,श्वसन इत्यादी महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष ठेवून सर्जनला लगेच सावध करतो. आणि शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाची सुरक्षितता डोळ्यात तेल घालून जपत असतो.
तो शेवटपर्यंत सर्जनचे लक्ष विचलित होऊ देत नाही. ज्या प्रमाणे रुग्णाला बेशुद्ध केले जाते,तसे त्याला शुद्धीवरही आणण्याची जबाबदारीही त्याचीच असते.
भूल देताना छोटी किंवा मोठी भूल असे काही नसते आणि प्रत्येक वेळी रुग्णाच्या सुरक्षित जागे होण्यामागे रुग्णाच्या शारिरीक स्थितीचा सर्वांगीण केलेला अभ्यास आणि अविरत परिश्रम कारणीभूत असतात .
हे दिव्य भूलशास्त्र तज्ञ लीलया पेलताना दिसत असला तरी त्यामागे वर्षानुवर्षे त्याने केलेल्या अभ्यासाची आणि कामाची तपश्चर्या महत्त्वाची असते.
स्पाईनल आणि एपीड्युरल ज्यांना “रिजनल अनेस्थेशिया ” असे म्हणतात या भूल देण्याच्या प्रकारांमध्ये कौशल्य आणि विशिष्ट तंत्र यांचा कस लागतो .
अशा प्रकारची भूल पूर्ण भूल देण्यापेक्षा अनेक रुग्णांमध्ये सुरक्षित असते.
प्रसूतीदरम्यान वेदनारहित प्रसूती करण्यासाठी सुरक्षित असा “एपीड्युरल अनॅस्थेशिया ” देऊन स्त्रियांना वेदनामुक्त करता येते.
त्याचे फायदे तोटे समजावून सांगून रुग्णांचे त्याबाबत योग्य समुपदेशन करणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे.
बऱ्याच वेळा रुग्ण अशाप्रकारच्या भूलीनंतर पाठ दुखण्याची तक्रार करतात. खरंतर पाठदुखी मागे इतर अनेक कारणे महत्त्वाची असतात ,त्यामुळे हा मोठा गैरसमज दूर करणे हीसुद्धा काळाची गरज बनली आहे .
आता हाताच्या अनेक शस्त्रक्रियांसाठी “ब्रेकियल प्लेक्सस ब्लॉक” म्हणजेच हाताच्या ठराविक नसांना बधिर करून उत्तम प्रकारे वेदनारहित शस्त्रक्रिया करणे सोपे आणि सुरक्षित बनले आहे.
दुर्बिणी द्वारे केल्या जात असलेल्या शस्त्रक्रियेत भूलतज्ज्ञ रुग्णाला कधी स्पाईनल आणि एपीड्युरल किंवा कृत्रिमरीत्या श्वासोच्छ्वास देतात. रक्तप्रवाहावर लॅप्रोस्कोपीचा परिणाम होतो. कार्बनडाय ऑक्साइडची नळी सोडल्यामुळे पोट फुगते, रक्तदाब वाढतो यावेळी भूलतज्ञ खूप महत्त्वाची भूमिका बजावतो.रोबोटीक शस्त्रक्रिया जरी शक्य असली तरी भूल देण्यासाठी मात्र अजुनही खुद्द भूलतज्ञ असणेच आवश्यक असते.
खरे तर ‘भूलतज्ज्ञ’ अजुनही लोकांना कळलेला नाही. तो केवळ भूलीचे इंजेक्शन देतो आणि जातो हेच लोकांना आजपर्यंत माहीत आहे.
भूलतज्ज्ञांची ही महत्वपूर्ण भूमिका कळण्यासाठी आजही जनतेत जनजागृती होणे गरजेचे आहे.आजचा भूलतज्ञ हा पडद्यामागचा कलाकार नसुन तो सर्जन ईतकाच महत्वाचा घटक आहे आणि म्हणूनच रुग्णांची सर्वांगीण शारिरीक सुरक्षितता जपुन,यशस्वी शस्त्रक्रियेचा चित्रपट सुपरहिट करण्यासाठी कायम लागणारा तो एक सुपरस्टार आहे हे मात्र नक्कीच.
आज जागतिक भूलशास्त्र दिनानिमित्त पारनेर तालुक्याचे भूमिपुत्र डॉ.बाळासाहेब बांडे या भूलतज्ज्ञाचा आजच वाढदिवस !हा योग योगायोगाने साधून आला.डॉ.बांडे हे अत्यंत सर्वसामान्य प्रतिकूल परिस्थितीतून अगदी रोजगार हमी पासून काम करून शिक्षण घेऊन हे डबल एमडी झाले. ते पुण्यात वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असले तरी तालुक्यातील सर्व सामान्यांना त्यांचा आजही आधार वाटत आहे. पारनेर तालुक्यासाठी ते एक प्रकारचे देवदूतच म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा