नगर : विखे पाटील आणि पवार कुटुंबामधील पिढीजात राजकीय हाडवैर, दोन्ही कुटुंबातले वाद, वैमनस्य, त्याचे काहीच महिन्यापूर्वी उमटलेले पडसाद या गोष्टी महाराष्ट्राला परिचित आहेत. पण विखे पवारांची आताची नवी पिढी मॉडर्न आहे. विचारांनी प्रगल्भ आहे. हे सगळं सांगायचं कारण म्हणजे विखे-पवारांमधील राजकारणापलीकडची मैत्री…! काल नगर दक्षिणचे भाजपाचे खासदार डॉ.सुजय विखे पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव,राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार यांनी एकाच विमानातून प्रवास केला आणि इम्प्रेस झालेल्या डॉ.सुजय विखेंनी तो फोटो आपल्या फेसबुकवर शेअर केला.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांची काल औरंगाबाद विमानतळावर भेट झाली. खा. सुजय विखे आणि पार्थ पवारांनी एकाच विमानाने प्रवासही केला.
औरंगाबाद ते मुंबई असा त्यांचा प्रवास होता. सुजय विखे पाटलांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन या प्रवासाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ते पार्थ पवार यांच्यासोबत विमानात बसलेले दिसत आहेत. या फोटोला विखे पाटलांनी कॅप्शनही असंच दिलेलं आहे. सर्व सीमांच्या पलिकडची मैत्री असं कॅप्शनही त्यांनी या फोटोंना दिलेलं आहे.
दरम्यान, यावरून नेटकऱ्यांमध्ये चर्चा सुरू झाली. काहींनी याचा राजकीय अर्थ काढून दोघांनाही पक्ष बदलणार काय? अशी विचारणा केली. काहींनी या मैत्रीचे कौतूक केले. अनेकांनी मात्र कडाडून टीका केली आहे.