मनुष्य धनवान असेल तर त्याची सर्वच आज्ञा पाळतात.अगदी वयाने मोठे असणारे सुद्धा शब्द पडु देत नाहीत.अशा स्थितीत त्या मनुष्याला वाटतं की आपल्यावर प्रेम करणारी किती माणसं आहेत,व्वा!जगण्यात मौज आहे.पण सत्य फार कठोर आहे.ही सारी माया एका धनामुळे आहे. हे प्रेम धनावर आहे त्या व्यक्तीवर नाही. ती व्यक्ती निर्धन झाली की मग कुणीही ऐकत नाही,त्याल कुणी विचारीत सुद्धा नाही.मी अशी अनेक उदाहरणं प्रत्यक्ष पाहिली आहेत.
भरपूर पैसा जमीन कमावण्यात आख्ख आयुष्य घातलेली व्यक्ती सध्या तीन मुलं असुनही जीवनाची संध्याकाळ एका वृद्धाश्रमात घालवत आहे. आणि हेच अंतिम सत्य आहे. हे सत्य तुकोबाराय आपल्या अभंगवाणीतुन सांगत आहेत.
धनवंतालागी सर्व मान्यता आहे जगी |
माता पिता बंधू जन सर्व मानिती वचन |
जंव मोठा चाले धंदा तंव बहीण म्हणे दादा |
सदा श्रृंगारभूषणें कांता लवे बहुमानें |
तुका म्हणे धन भाग्य अशाश्वत जाण ||
तुकोबाराय शाश्वताची जाणीव करुन देत आहेत.जोपर्यंत तुमच्याकडे धनदौलत आहे तोपर्यंत तुमचा उदोउदो होणार आहे आणि त्याचा लाभ जोपर्यंत होतो आहे, नातेवाईक सुद्धा तोपर्यंतच तुमच्या जवळ असणार आहेत.तुम्ही निर्धन झालात की प्रेम आटलेच म्हणून समजा.
जन हे सुखाचें दिल्या घेतल्याचे।
अंत हे काळीचे नाही कुणी।। हे त्रिवार सत्य आहे.खऱ्या प्रेमाला धनाची आवश्यकता नाही पण असं प्रेम दुर्मिळ आहे. धन शाश्वत नाही. आज आहे उद्या नसेल किंवा आज नसले तर उद्या येईलही पण खऱ्या प्रेमाला यामुळे काही फरक पडत नाही. असं प्रेम केवळ भगवतभक्तीत आहे. तिथे फक्त नामाचा व्यवहार आहे.शेवटचा साथी नामचिंतनच आहे.
रामकृष्णहरी