Take a fresh look at your lifestyle.

बापरे ! धोत्रे येथील पेयजल योजनेचे दोन कोटींचे दप्तरच गहाळ !

दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी.

पारनेर : तालुक्यातील धोत्रे बुद्रुक येथे राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत झालेल्या दोन कोटी ३८ लाख रुपयांचे काम शासनाच्या प्लॅन इस्टिमेटनुसार झालेले नसून, या कामाचे दप्तर गहाळ करणाऱ्या तत्कालीन ग्रामसेवक व पाणी स्वच्छता समितीचे अध्यक्ष यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
धोत्रे येथे राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत धोत्रे पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली. या योजनेसाठी तब्बल दोन कोटी ३८ लाख रुपये खर्च करण्यात आला. ही योजना फक्त गावठाण हद्दीत असून, ती शासनाच्या प्लॅन इस्टिमेटनुसार वितरीत केली नसल्याने संघटनेच्या वतीने अनेक वेळा पत्रव्यवहार केले. मात्र अद्याप शासनाने कुठलीही कारवाई केलेली नाही.
धोत्रे पाणी पुरवठा योजनेचे दोन कोटी ३८ लाख रुपये पाणीपुरवठा स्वच्छता समितीने घेतले. त्या समितीचे इतिवृत्त अनेक वेळा माहिती अधिकारात मागून देखील मिळाले नाही. यावर राज्य माहिती आयोगाने २३ मे २०१९ रोजी आदेश देऊनही दप्तर उपलब्ध करण्यात आलेले नाही. ग्रामसेवकाने त्यांच्या कार्यकाळात या योजनेचा उल्लेख देखील केलेला नाही.
या पाणी योजनेचे काम शासकीय प्लॅन इस्टिमेटनुसार झालेले नसताना, बिलापोटी दोन कोटी ३८ लाख रुपयाची रक्कम कशाच्या आधारे अदा करण्यात आली? ज्या समितीने हा खर्च केला त्या समितीचे दप्तर देखील उपलब्ध होत नसेल तर हा खर्च कसा करण्यात आला असा प्रश्न संघटनेच्या वतीने उपस्थित करण्यात आला आहे.
या योजनेत अपहार झाला असताना त्याची चौकशी होऊन तत्कालीन ग्रामसेवक व पाणी स्वच्छता समितीचे अध्यक्ष यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे.