मंचर : राज्याचे गृहखात्याची जबाबदारी देताना अनेकांना विचारणा केली जाते. त्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांना साद घातली. पण, गृहमंत्रीपद म्हटलं की माझा बीपी वाढतोय, असे म्हणत जयंत पाटलांनी ती जबाबदारी ढकलली. छगन भुजबळ यांनी तर न बोलताच नकार दिला. त्यानंतर ही जबाबदारी दिलीप वळसे पाटील यांनी स्वीकारली. आपल्याला अशा व्याधी होऊ नये; म्हणजे बरं.., असं भाष्य करत अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर गृहमंत्रीपद सोपविण्याबाबत पक्षात घडलेल्या घडामोडी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वळसे पाटलांसमोरच उलगडल्या.
आंबेगाव पंचायत समितीच्या कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेल्या इमारतीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते काल दसऱ्याच्या मुहूर्तावर करण्यात आले. त्यावेळी बोलत होते. ते म्हणाले की, राज्यभरातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या कारभाऱ्यांची मुदत येत्या डिसेंबर, जानेवारीत संपतेय. त्यातच आपल्या काळात झालेल्या विकासाचं श्रेय आपल्याच पदरी पडावं म्हणून का होईना आपल्या नेत्यांच्या कानी लागून उद्घाटनांचा घाट घातला जातोय, याचं प्रत्यय खुद्द गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या आंबेगाव तालुक्यात आला.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, दिलीप वळसे पाटलांकडे आज गृहमंत्री पद आहे. फार बारकाईने, डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावं लागते. कायदा सुव्यवस्था कशी योग्य राहील. कोणावर अन्याय होणार नाही याची खबरदारी घ्यावी लागते.
मागे आर आर आबा, छगन भुजबळ मग जयंत पाटील यांनी एक वर्ष गृहमंत्री पद सांभाळलं. मी यावेळी जयंतरावांना म्हटलं की तुम्ही एकच वर्ष गृहमंत्री पदी होता, आता यावेळी परत घ्या ना. पण जयंतराव म्हणाले, नाही… ते म्हणाले गृहखाते घेतल्यावर माझा बीपी वाढेल. मला गोळ्या सुरू झाल्या. मला नको गृह विभाग. लगेच पत्रकार ब्रेकिंग चालवतील, नाहीतर जयंतराव म्हणतील अजित तू काहीही माझं सांगत बसतो. दिलीपराव तसं आपलं काही होऊ नये. उलट आपल्याला ज्या काही व्याधी असतील त्या गृहखातं मिळालं म्हणून त्या सर्व व्याधी दूर व्हावं अन् तुम्ही एकदम ठणठणीत व्हा, असेही अजित पवार म्हणाले.