Take a fresh look at your lifestyle.

विवंचना स्वनिर्मित आहेत !

इतर प्राणीमात्रांना जगण्याची चिंता पडत नाही.

एक खूप श्रीमंत शेठजी होते.भरपूर संपत्ती होती.पुढील सातपिढ्यांनी बसून खायचे ठरवले तरी पुरेल एवढी संपत्ती मिळवली होती.तरी पण हा श्रीमंत सुखी नव्हता . मनात काहीतरी विवंचना होती त्यामुळे रात्रभर त्याला झोपच येत नसे.खऱ्या सुखाला तो वंचित झाला होता.
त्याने प्रत्येकाला विचारावे मी काय करू म्हणजे या विवंचनेतून मी सुटेन आणि मला सुखाची झोप लागेल?त्याला कोणीतरी सांगितले तू संताना शरण जा म्हणजे संतच यातून तुला सोडवतील.
मग शेठजी संतांच्या शोधार्थ निघाला. एका झोपडीत एक साधु ध्यानस्थ बसला होता.शेठजीने त्याला नमस्कार करून आपली विवंचना सांगितली, म्हणाला महाराज मला काहीही कमी नाही पुढील सात पिढ्या बसुन खातील एवढं मिळवलं आहे तरी मी सुखी नाही, एक विवंचना मला झोप येवु देत नाही त्यामुळे मी खूप दुःखी आहे.

साधु म्हणाला,नेमकी विवंचना काय आहे ते सांग म्हणजे उपाय योजता येईल. शेठजी म्हणाला, महाराज तसं म्हणाल तर मला काहीही विवंचना नाही पण एकच विवंचना आहे आणि ती म्हणजे माझ्या आठव्या पिढीचे काय होईल ? कारण सात पिढ्याचे कमवून ठेवले आहे चिंता आहे ती आठव्या पिढीची.
साधु हसला, म्हणाले काळजी करु नकोस मी तुला यातून नक्की सोडवतो.
साधुने त्याला एक किलोभर तांदळाची पिशवी दिली आणि सांगितले की समोरच्या डोंगरावर ती झोपडी दिसते ना,तिथे एक म्हातारी राहते तिला हे तांदूळ देवून ये म्हणजे मी तुला तुझ्या विवंचनेतून मुक्त करतो .
तांदूळ घेऊन शेठजी डोंगरावर त्या म्हातारीच्या झोपडीत आला.ती भगवंताच्या हरीनामात दंग होती.तिची समाधी लागली होती.शेठजीने आवाज दिल्यावर तिने डोळे उघडले.शेठजीला म्हणाली,काय काम आहे?तो म्हणाला म्हातारे तुला तांदूळ द्यायला आलो आहे हे घे मग मी जातो . ती म्हणाली कारे तुला मागीतले होते का ? तुझ्या समोर हात पसरला होता का ? नाही ना ? मग कशाला आणलेस तांदूळ ? ही पिशवी उचल आणि चालायला लाग.तो म्हणाला मला त्या झोपडीतल्या साधुने पाठवले आहे म्हणून मी आलोय. ती म्हणाली त्या साधुला जाऊन सांग की अजून दोन दिवस पुरतील एवढे तांदूळ माझ्या झोपडीत आहेत.
शेठजी लगेच म्हणाला,म्हातारे तिसर्‍या दिवसाला होतील राहू दे.ती म्हणाली माझ्या तिसऱ्या दिवसाची चिंता तुलाही नको आणि त्या साधुलाही नको त्याला सांग माझ्या तिसर्‍या दिवसाच्या तांदळाची चिंता करणारा माझा भगवंत आहे.मग नाविलाजाने शेठजी पिशवी घेऊन परत आला आणि साधु समोर पिशवी ठेवून घरी निघाला. साधुने त्याला हाक मारली अरे ! विवंचना घेऊन आला होतास ना ? मी तुला त्यातुन सोडवणार आहे. श्रीमंत खाली मान घालून म्हणाला महाराज मला उत्तर मिळाले तिसऱ्या दिवसाच्या तांदळाची चिंता न करणारी म्हातारी जेवढी सुखी आहे तेवढा मी दुःखी आहे.आता मला पुढच्या पिढीचीही चिंता राहिली नाही.
सज्जनहो आम्ही सुद्धा या कथेत कुठतरी बसतोय.विवंचना ठान मांडुन आहेत.उद्या कसं होईल?ही विवंचना सतत घर करुन बसली आहे.त्यामुळे आजचा जगण्यातला आनंद काळवंडून गेला आहे. मुलाला लवकर नोकरी लागली नाही, लग्न वेळेवर व्हायला दिरंगाई होत असेल,आर्थिक ताण निर्माण होत असेल तर विवंचनामय जीवन होऊन जाते.नित्य चिंता सोबत रहाते.चिंता सोबत असताना आनंदी जीवन जगणं कसं शक्य आहे?आणि चिंता न करता बिनधास्त जगणही अशक्य आहे. अशावेळी काय करावं हा प्रश्न निरुत्तर करणारा आहे.

सज्जनहो यावर उपाय आहे हे निश्चित. जबाबदाऱ्या टाळता येणार नाही. ताणतणाव टाळता येणार नाही. मग काय करावं?आपली मानसिकता बदलणं हेच आमच्या हातात आहे. जे आहे ते आनंदाने भोगता यायला हवे.उद्याची चिंता करत बसण्याला फार अर्थ नाही.पण त्यासाठी अतिरिक्त सात्विक सकारात्मक ऊर्जा मिळवता आली पाहिजे. पहाटे उठुन श्वसनक्रियेवर केलेले प्रयोग अत्यंत सिद्ध स्वरुपाचे आहेत.श्वासांवर नियंत्रण मिळवता आले पाहिजे. दिर्घश्वास क्रिया हीच चिंतातुर,विवंचनामय जीवनातुन मार्ग दाखवणारी वाट आहे. नियमिततेने श्वसनगती कमी होते.म्हणजेच प्राणमयकोशावर नियंत्रण मिळवता येते.
धक्कादायक गोष्टी सहन करण्याचं बळ येते. श्वासावर नियंत्रण मिळवता आले की विवंचनेत सुद्धा न डगमगता नित्य जीवनाचा आनंद घेता येतो.अर्थात हे प्रयत्नसाध्य आहे. धारणेसोबत ध्यान करता आले तर ते अधिक सोपे होते.ध्यानधारणेनं निश्चित आत्मकल्याण होते.मी या वाटेवरचा पांथस्थ आहे.शिकतो आहे. थोडंफार जरी जमलं तरी आनंद आभाळभर आहे.
रामकृष्णहरी