Take a fresh look at your lifestyle.

साधनांची आवश्यकता तृप्ती होईपर्यंतच !

...नाही तर सर्व व्यर्थ आहे.

भुकेल्या पोटाची तृप्ती करण्यासाठी केलेलं साधन मग स्वयंपाक सिद्धिचं सर्व साहित्य आलं.गॅस पासुन ते पिठ,भाजी,मसाले,तवा,कलथा,परात ताट,तांब्या सगळं पाहिजे. एकदा भाजी भाकर तयार झाली की मग यथेच्छ भोजन करुन तृप्तीचा ढेकर येतो.एकदा तृप्ती झाली की मग ही साधनं घेऊन फिरण्याची गरज रहात नाही.पण एवढा सगळा खटाटोप करुन जर पोट भरलं नाही तर केलेलं साधन कुचकामी ठरतं. हे झालं व्यवहारातलं उदाहरण.
तुकोबाराय म्हणतात, आयुष्य जगताना जगुन तृप्त झाल्याचा आनंद मिळाला पाहिजे. जीवंतपणीच आपल्या मुक्तीचा सोहळा आपल्याला पहायला मिळायला हवा.जीवंत असतानाच मृत्यू पहाता यायला हवा.

महाराज म्हणतात,आपुले मरण पाहिले म्या डोळा।तो जाला सोहळा अनुपम्य।। सर्व इच्छा लोप पावल्या की अशी अवस्था प्राप्त होते.
एरव्ही आम्ही अनेक उदाहरणे पहातो शंभरी गाठलेल्या वृद्धालाही अजुन जगण्याची इच्छा असते.तृप्तता प्राप्त करता आली नाही की मग कितीही आयुष्य मिळाले तरी ते व्यर्थ जगणे आहे. तुकोबारायांनी ती तृप्तता अनुभवण्यासाठी जे साधन आणि साधना केली ती फळाला आल्याने तृप्तीचा अनुभव आला.महाराज म्हणतात,
याजसाठी केला होता अट्टाहास।शेवटचा दिस गोड व्हावा।।
आता निश्चिंतीने पावलो विसावा।खुंटलिया धावा तृष्णेचिया।। महाराज म्हणतात, माझा आटापिटा याचसाठी होता की मला जीवंत असतानाच माझ्या मुक्तीचा सोहळा मला अनुभवता आला पाहिजे.मुक्ती म्हणजेच तृप्ती. एकदा पोट भरले की ढेकर येतो मग कितीही आवडीचा पदार्थ आला तरी नाही म्हणावे लागते.कितीही आग्रह झाला तरी पोटात जागाच नसल्याने त्याचा मोह होत नाही.असा तृप्तीचा ढेकर विषयवासनांचा येणे म्हणजे मुक्ती आहे. आपण बद्ध आहोत हे समजल्याखेरीज मुक्तीची वाट चोखाळता येणार नाही.
आपल्याला वरवर सगळं मुक्त दिसते.पण बाहेर गावी आपण गेलो आणि रात्री कितीही उशीर झाला तरी पावलं घराकडेच ओढ घेतात हे कशामुळे होतं? हिच तर बद्ध असल्याची क्रिया आहे.गळ्याला दोर नसतानाही खुंट्याभोवती फिरण्याची इच्छा होणे म्हणजे बद्धता होय.याउलट एखादा भिकारी भिक्षा मागत फिरत असतो.त्याला घरदार नसल्याने ज्या गावात रात्र होईल तेथेच तो निवारा शोधतो.अर्थात तो ही बद्ध आहेच.भिक्षा मागुन जीवंत रहाण्याची इच्छा ही बद्धताच आहे.पण घरदार असणाराला प्रपंच खुंटुन ठेवतो.ती बद्धता डोळ्यांना दिसत नाही.
ज्ञानमार्ग ही बद्धता हळूहळू कमी करुन तृप्तीचा अनुभव देण्यास सिद्ध आहे.म्हणजे प्रपंच त्यागायचा असा त्याचा अर्थ नव्हे.कर्म करतच रहावे लागेल मात्र तृप्तता प्राप्त झाली की कोणत्याही कर्माचा बोजा होणार नाही. पोट भरलेल्या व्यक्तीला जेवन वाढण्याचे काम दिले की त्याच्यावर त्या घमघमाटाचा किंवा आवडीचे पदार्थ जरी हातात असले तरीही तो खाण्याचा मोह होत नाही की तोंडाला पाणी सुटत नाही. कर्म करताना हिच अवस्था प्राप्त झाली पाहिजे.त्यासाठी योग्य साधनांची निवड करता येणे हे कौशल्य आहे.
प्रवास करताना वाहन सुस्थितीत नसले तर प्रवासात अकारण अडथळा निर्माण होतो.अपेक्षित ठिकाणी जाण्यासाठी विलंब होतो किंवा वाहन दोषाने अपघातही होतो.तद्वत ठिकाणापर्यंतचा जीवनप्रवास निश्चिंतीने होण्यासाठी योग्य साधन केले पाहिजे.म्हणजे शेवट गोड होण्याचा मार्ग मोकळा होतो.
रामकृष्णहरी