‘ही’ इमारत पाहून तुम्ही म्हणाल, असं कुठं असतंय व्हय ?
अनोख्या रचनेचं अनेकांना वाटतंय आश्चर्य.
आपल्या भारतात जुगाडू लोकांची कमी नाही. एखाद्या जागेचा जास्तीत-जास्त वापर कसा करून घेता येईल, याचे एक उत्तम उदाहरण समोर आले आहे. राजस्थानची राजधानी जयपूरमधील एक शॉपिंग कॉम्प्लेक्सचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
प्रदीप शेखावत नावाच्या व्यक्तीने या इमारतीचा फोटो सोशल मीडियावर टाकल्यानंतर त्यावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. फोटोत दिसणाऱ्या या इमारतीची जागा 10 बाय 20 मीटर आहे. मात्र त्यावर बांधण्यात आलेल्या दुसऱ्या मजल्याचा एरिया आहे 20 बाय 30 मीटरचा आहे. पहिल्या मजल्यावर बांधण्यात आलेल्या दुकानाचा एखाद्या पिलरप्रमाणं वापर करून वरच्या मजल्याचा विस्तार वाढवला गेला आहे.
इमारतीची अनोखी रचना पाहून अनेकांना आश्चर्य वाटत आहे. वरच्या मजल्यावरचा स्लॅब वाढवून जणू चारही बाजूंनी गॅलरी तयार केली आहे. मात्र याचा गॅलरीसारखा वापर न करता त्याला पूर्ण खोलीचं स्वरूप दिले गेले आहे.
यामुळे वरच्या मजल्यावरील दुकान प्रशस्त झाले आहे. मूळ जागा कमी असतानाही अनोखी शक्कल लढवून बांधलेल्या या इमारतीची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगत आहे. मात्र पालिकेच्या नियमांत अशी इमारत बांधणं बसतं का? हे पाहणंही महत्त्वाचं आहे.