Take a fresh look at your lifestyle.

पारनेरची कन्या आज झळकणार कोण होणार करोडपतीमध्ये !

माझ्यासाठी हा विजय अविस्मरणीय :कल्पना सावंत 

पारनेर : तालुक्यातील पिंपळनेरच्या कन्या आणि काही काळ पारनेर महाविद्यालयात नोकरी केलेल्या व सध्या पुण्याच्या रामकृष्ण मोरे महाविद्यालय सहाय्यक प्राध्यापक पदावर कार्यरत असणाऱ्या कल्पना सावंत या कोण होणार करोडपती या मालिकेच्या विशेष भागात झळकणार आहेत.सोनी मराठी वाहिनीवर या भागाचे आजपासून (सोमवार ) ते दि. ८ सप्टेंबरपर्यंत प्रक्षेपण होणार आहे दरम्यान,हा विजय माझ्यासाठी अविस्मरणीयच असल्याची प्रतिक्रिया सावंत यांनी व्यक्त केली.

सध्या सोनी मराठी वाहिनीवरील कोण होणार करोडपती या लोकप्रिय कार्यक्रमात उत्तुंग यशाची भरारी पारनेरच्या कल्पना सावंत या कन्येने यशस्वीरित्या पूर्ण केली आहे.पारनेर हा कायम दुष्काळी भाग राहत आलेला आहे. अशा या तालुक्यातील विद्यार्थी कायम संघर्षमय जीवनाची वाटचाल करत अभ्यास करत आलेला आहे. अशा विद्यार्थ्यांपैकी कल्पना ही एक पिंपळनेर येथील हुशार विद्यार्थिनी.आई – वडील शेतकरी. घरची परिस्थितीही बेताचीच अशा वातावरणात कल्पनाने प्रचंड मेहनत घेऊन आपले शिक्षण पूर्ण केले.

अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या न्यू आर्टस् कॉमर्स अँण्ड सायन्स कॉलेज पारनेर महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक पदावर काही काळ तिने काम केले. नंतर याच महाविद्यालयात ती सध्या पीएच्.डीचे संशोधन करत आहे. सध्या ती पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे रामकृष्ण मोरे महाविद्यालय,पुणे येथे वनस्पतिशास्त्र विषयाची सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे.

कल्पना सावंत हिने सोनी टीव्हीवरील लोकप्रिय कार्यक्रम कोण होणार करोडपती या कार्यक्रमामध्ये एक रोमहर्षक इतिहासच रचला आहे. हा रोमहर्षक विजय ६ व ७ सप्टेंबरला सोनी मराठी वाहिनीवर रात्री ९.०० वाजता आपल्या सर्वांना पाहायला मिळणार आहे.त्यांना लाभलेले गुरुजन, त्यांनी घेतलेले शिक्षण आणि आता सध्या पीएच्.डीसाठी संशोधन करत असताना सातत्याने करत असलेला अभ्यास,अवांतर वाचन ,चौकस आणि व्यापक समाजविषयक दृष्टीकोण या अशा ज्ञानाच्या जोरावर त्यांनी हा प्रवास सहज साकार केलेला आहे.

या प्रवासाविषयी बोलताना त्या म्हणाल्या,माझ्यासाठी हा विजय म्हणजे एक अविस्मरणीय असा क्षण आहे. जो मी कधीच विसरू शकत नाही. मी आत्तापर्यंत महाविद्यालयीन जीवनामध्ये अनेक स्पर्धांमध्ये भाग घेत आले आणि यश संपादन केलं. परंतु हा आनंद काहीतरी वेगळाच आहे. या यशामुळे माझा आत्मविश्वास उंचावलेला आहे व मला आयुष्यामध्ये यशाची अनेक शिखरे पादाक्रांत करण्यासाठी हा विजय सतत प्रोत्साहन देणारा आहे. या माझ्या विजयामध्ये माझे आई-वडील, माझे कुटुंब आणि मला घडवणारे शिक्षक यांचा सिंहाचा वाटा आहे.मी ज्या न्यू आर्टस् कॉमर्स अँण्ड सायन्स कॉलेज पारनेर महाविद्यालयामध्ये नोकरी केली व सध्या पीएच्.डीचे संशोधन याच महाविद्यालयामध्ये करत आहे. तेथील माझे मार्गदर्शक डॉ. रवींद्र देशमुख, प्राचार्य डॉ.रंगनाथ आहेर,उपप्राचार्य डॉ.दिलीप ठुबे व इतर सर्व शिक्षकांनी मला सातत्याने प्रोत्साहन दिले. या प्रोत्साहनामुळेच मी यशाच्या शिखरापर्यंत पोहचू शकले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर हे करत आहेत. कल्पना सावंत हिच्या यशाबद्दल तिचे अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार झावरे, उपाध्यक्ष रामचंद्र दरे ,सचिव जी. डी. खानदेशे, सहसचिव विश्वासराव आठरे, खजिनदार डॉ.मुकेश मुळे,ज्येष्ठ विश्वस्त सिताराम खिलारी, पारनेर पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान सदस्य राहुल झावरे यांनी अभिनंदन केले आहे.