Take a fresh look at your lifestyle.

गुड न्यूज : आमदार निधीमध्ये एक कोटींची वाढ !

राज्य सरकारचा मोठा निर्णय.

मुंबई : राज्यातील विधानसभा व विधान परिषद या दोन्ही सभागृहातील आमदारांच्या स्थानिक विकास निधीत १ कोटी रूपयांची वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने आज घेतला आहे. या निधीतून आमदारांना मतदारसंघातील विकास काम करता येणार आहेत.
सध्या आमदारांचा विकास निधी ३ कोटी रुपये आहे. त्यात १ कोटी रुपयांची वाढ करून तो ४ कोटी करण्यात आला आहे. या निधीतून आमदारांना मतदारसंघातील विकास कामे करता येतात. शाळा, अंगणवाडी, सार्वजनिक शौचालय, स्मशानभूमी यासारखी विकास कामे करता येतात. पण, लोकप्रतिनिधी एकदा निवडून आल्यानंतर मतदारसंघाकडे दुर्लक्ष करतात, असा आरोप केला जातो. तसेच आमदारकीच्या कार्यकाळात नेत्याने कामे केले नाहीत, असाही आरोप होतो.
निधी कमी असल्याची ओरड आमदारांकडून केली जाते. त्यामुळेच राज्य सरकारने निर्णय घेत आमदारांच्या स्थानिक निधीमध्ये १ कोटी रुपयांची वाढ करून ती ४ कोटी केलेली आहे. पण, वाढीव निधी मिळाल्यानंतर विकास कामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.आमदार निधीतून करण्यात येणाऱ्या कामात शौचालयांचे बांधकाम, व्यायामशाळांचे बांधकाम, स्मशानभूमीची कामे, बसथांबा बांधकाम, अंगणवाडी केंद्र बांधकाम या कामांचा समावेश असतो.
 सन २०२०-२१ च्या अर्थसंकल्पातील ‘अनुदानाच्या मागण्या’ या विषयावरील चर्चेला उत्तर देताना वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी आमदार निधीमध्ये १ कोटी रुपयांची वाढ करण्याबाबत ग्वाही दिली होती. त्यानुसार गुरुवारी शासनाने दोन्ही सभागृहातील आमदारांना २०२०-२१ या आर्थिक वर्षापासून ४ कोटी रुपये विकास निधी देण्याबाबत शासन आदेश जारी केला आहे.