अहमदनगर :जिल्ह्यातील पाथर्डी, पारनेर, शेवगाव, राहुरी आदी तालुक्यांसह अनेक ठिकाणी मागील दीड महिन्यांत अतिवृष्टी झाली होती. जिल्हा प्रशासनाने या अतिवृष्टीचे पंचनामे देखील केले. मात्र शेतकऱ्यांना अजूनही नुकसान भरपाई मिळालेली नाही. या भागातील शेतकऱ्यांचे दुःख जाणून घेण्यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ जिल्ह्यात फिरकले नाहीत. राज्य शासनाने काल जाहीर केलेले पॅकेज अतिशय अपुरे आहे. याची जाणीव बहुदा मुश्रीफ यांना झाली असावी. मुश्रीफ हे राज्य शासनाच्या अकाउंट मध्ये किती बॅलन्स आहे किती पैसे आले व किती पैसे गेले हे चेक करूनच नगर जिल्ह्यात येतील असा टोला आज खा. डॉ.सुजय विखे यांनी हसन मुश्रीफ यांना लगावला आहे.
नगर जिल्ह्यातील अतिवृष्टी झालेल्या भागातील विशेषतः शेवगाव पाथर्डी तालुक्यातील गावामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. त्याकरीता शेतकऱ्यांना राज्य सरकार कडून तातडीची आर्थिक मदत मिळण्यासाठी आ. मोनिका राजळे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सरकारकडून तातडीची आर्थिक मदत मिळण्यासाठी अहमदनगर जिल्हा भारतीय जनता पक्षातर्फे अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील जिल्हा भूजलसर्वेक्षण कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
खा. डॉ.सुजय विखे याप्रसंगी म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यापासून सत्ताधारी लोकप्रतिनिधींच्या अनेक नियमबाह्य गोष्टींकडे कानाडोळा करण्याचे काम प्रशासन करीत आहे. एकीकडे नगर जिल्ह्यात अनेक गावांत अन्यायकारक पध्दतीने लॉकडाऊन केला जात आहे.
त्याचवेळी सत्ताधारी, लोकप्रतिनिधी दसऱ्याच्या दिवशी मोठमोठ्या कार्यक्रमांचे आयोजन करून लोकांना गर्दी जमवण्याचे आवाहन करीत आहेत. हा पक्षपातीपणा असून जिल्हाधिकारीही अशा सत्ताधारी लोकप्रतिनिधींवर कारवाई करण्याचे धाडस दाखवू शकत नाहीत. खा. विखे यांनी आ. रोहित पवार यांचे नाव न घेता उद्याच्या स्वराज्य ध्वज अनावरण कार्यक्रमावेळी होणाऱ्या गर्दीकडे लक्ष वेधले आहे. सत्ताधारी लोकप्रतिनिधी कोरोना काळात अनेक निर्बंध धाब्यावर बसवत होते. तेव्हाही प्रशासनाकडून कारवाई झाली नसल्याचे खा.विखे म्हणाले.