Take a fresh look at your lifestyle.

“अहो ! चित्रा वाघ,अगोदर तुमच्या नवऱ्याला नितीमत्ता शिकवा !”

राष्ट्रवादीचे महेबूब शेख यांचा चित्रा वाघांवर पलटवार.

पारनेर : “अहो चित्रा वाघ लाचखोर नवऱ्याची बायको ही तुमची महाराष्ट्राला ओळख आहे. अगोदर नीतिमत्ता तुमच्या नवऱ्याला शिकवा नंतर आम्हाला शिकवा, असे सांगत, करीत महिलांचा आदर आम्हाला काय शिकवताय?, राष्ट्रवादी पक्षच महिलांचा आदर करणारा पक्ष आहे. आधी आपल्या घरात नीतिमत्ता शिकवा”, अशी खरमरीत टीका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांच्यावर केली.

तालुक्यातील वनकुटे ते वडगाव सावताळ रस्ता सुधारणा करणे,वनकुटे ते पठारवाडी रस्ता सुधारणा करणे,हनुमान नगर येथे पाणी पुरवठा पाईपलाईन करणे, व्यायाम साहित्य बसवणे रक्कम आदी विविध विकास कामांचा शुभारंभ सरपंच राहुल झावरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते करण्यात आले.आमदार निलेश लंके अध्यक्षस्थानी होते. यावेळी झालेल्या कार्यक्रमात महेबूब शेख बोलत होते.

आमदार निलेश लंके यांनी कोरोना काळात केलेल्या कामाने ते पूर्ण देशात लोकप्रिय झाले आहेत. परंतु मागील महिन्यात पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी त्यांच्यावर आरोप केले होते. यानंतर चित्रा वाघ यांनी आक्रमक भूमिका घेत निलेश लंके यांच्यावर आरोपाच्या फैरी झाडल्या होत्या. याच आरोप प्रत्यारोपांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी शेलक्या भाषेत उत्तर दिले.

यावेळी बोलताना शेख म्हणाले की,“तुमच्या-माझ्या सारख्या कार्यकर्त्याला चित्रा वाघ नीतिमत्ता शिकवायला निघाल्या आहेत. आधी तुमच्या नवऱ्याला नीतिमत्ता शिकवा, नंतर आम्हाला शिकवा. तुमचे पती लाच घेतल्याप्रकरणी अटकेत होते अशी आठवण करून देत मेलेल्या मढयावरचं लोणी खाणारी तुमची अवलाद, तुम्ही आम्हाला नीतिमत्ता शिकवताय, अशा शब्दात मेहबूब शेख यांनी चित्रा वाघ यांच्यावर हल्ला चढवला.

तुमच्या नवऱ्याकडे बेहिशोबी मालमत्ता सापडली, हे मी नाही बोलत तर एसीबीचा रिपोर्ट आहे, असेही शेख म्हणाले.

सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा पुढे जात असेल तर ती गोष्ट कुणाच्या तरी डोळ्यात खुपते

आमदार निलेश लंके यांच्यावर तहसीलदार ज्योती देवरे यांनी केलेल्या आरोपावर देखील त्यांनी भाष्य केले. “लंके यांच्यावर आरोप झाला मात्र सर्वसामान्य कुटुंबातील एखादा कार्यकर्ता स्वतःच्या मेहनतीवर स्वतःचं अस्तिव निर्माण करत असेल त्यावेळी ही गोष्ट कोणाच्या तरी डोळ्यात खुपत असते, त्यातून असे आरोप होत असतात”, असेही शेख म्हणाले.

“पूर्वी लोक कोणाला खल्लास करायचं असेल तर डाकूला सुपाऱ्या द्यायचे. मात्र आता सुपारीची नवीन पद्धत निघाली आहे. एखाद्या चांगल्या माणसाला बदनाम करायची सुपारी दिली जाते. तुमचं प्रकरण विचित्र पध्दतीने लोकांसमोर मांडल गेले असून माझ्यावरही असेच आरोप झाले. तुमच्या वेळी मुंबईवरुन ज्या धावून आल्या, त्या सकाळ संध्याकाळ माझं नाव घेतात”, असा टोलाही मेहबूब शेख यांनी वाघ यांना लगावला.

“ज्या दिवशी माझ्यावर आरोप झाला त्याच दिवशी पत्रकार परिषद घेऊन मी सांगितले की माझी नार्को टेस्ट करा. दोषी असेल तर मला चौकात फासावर चढवा… जसं मी पुढे येऊन सांगतोय तसं तुम्हीही पुढे येऊन सांगा, माझा नवरा दोषी नाही… त्याची देखील नार्को टेस्ट करा”, असं आव्हानच त्यांनी चित्रा वाघ यांना दिले.

तसेच चित्रा वाघ यांना राष्ट्रवादीचे सर्व लोक ओळखतात… कुणीही त्यांना गांभीर्याने घेत नसून भाजपचे लोक सांगतात तुमचं नाव करायचं असेल तर 5 कोटी द्या, अशी मागणी त्या करतात…. अशा प्रकारची अनेक प्रकरणं माझ्याकडे आहेत… योग्यवेळी पुराव्यानिशी बोलेल, असा इशाराच त्यांनी चित्रा वाघ यांना दिला.

प्रास्ताविक सरपंच राहूल झावरे यांनी केले. आ.लंके, राज्यमंत्री तनपुरे, प्रशांत गायकवाड,अशोक कटारिया आदिंची यावेळी भाषणे झाली. उध्दव काळापहाड यांनी सुत्रसंचलन केले. यावेळी

राहुरीचे सभापती अण्णा सोंडकर, हिंदकेसरी पै.संतोष वेताळ,सोमनाथ वरखडे,दादा शिंदे,बापू शिर्के,विजू औटी,रविंद्र गायखे,सचिन पठारे, कारभारी पोटघन मेजर,किशोर यादव,डॉ. बाळासाहेब कावरे,श्रीकांत चौरे,आप्पा शिंदे,भागा गावडे,बाळासाहेब लंके,पत्रकार विजय वाघमारे, अॅड.गणेश कावरे व परिसरातील गावांचे सरपंच,उपसरपंच व पदाधिकारी उपस्थित होते.