Take a fresh look at your lifestyle.

“मला आजही वाटते,मी मुख्यमंत्रीच आहे !”

देवेंद्र फडणवीसांचा अजब दावा !

मुंबई : मी सध्या कोणत्या पदावर आहे हे महत्त्वाचे नसून गेली दोन वर्षे घरी न थांबता मी जनतेत मिसळतोय, सामान्य जनतेची कामे करतोय. आमची लोकोपयोगी कामे सुरूच आहेत. त्यामुळे मी आजही मुख्यमंत्री असल्याचे मला वाटते, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबईत बोलताना केले. बेलापूरच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या पुढाकाराने नवी मुंबईकरांच्या सेवेत लोकार्पण करण्यात आलेल्या ‘रुग्णवाहिका आणि सर्वसुविधा युक्त प्रसाधनगृह बस विधायक उपक्रम’ कार्यक्रमात ते बोलत होते.

श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्थेच्या माध्यमातून नवी मुंबईतील गरजू रुग्णांच्या आरोग्य सेवेसाठी सर्व सुविधायुक्त रुग्णवाहिका व एपीएमसी मधील व्यापारी-माथाडी यांना टाकाऊ मधून टिकाऊ तयार करण्यात आलेली सर्व सुविधांयुक्त प्रसाधनगृह बस यांचा लोकार्पण सोहळा माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री गणेश नाईक,आमदार रामेशदादा पाटील, माजी आमदार व माथाडी नेते नरेंद्र पाटील, भाजपचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष डॉ.रामचंद्र घरत, माजी महापौर जयवंत सुतार आदी मान्यवर उपस्थित होते. दिवाळे गावातील ८० मासेविक्रेत्या महिलांना बेलापूरच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नाने व्यवसाय परवाने प्राप्त झाले. प्राथमिक स्वरूपात त्यापैकी ५ मासेविक्री भगिनींना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते परवाने वाटप यावेळी करण्यात आले. माजी मंत्री गणेश नाईक यांनी आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या समाजाभिमुख कामाचे आपल्या भाषणात कौतुक केले.
 ▪️पंकजा मुंडेंची मिश्किल टिप्पणी.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने औरंगाबाद येथे ओबीसी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पत्रकारांनी त्यांना फडणवीस यांनी आजही मला मुख्यमंत्री असल्यासारखे वाटते, असे विधान केले आहे, त्यावर आपल्याला काय वाटते, असा प्रश्न विचारला होता. त्यावर त्या म्हणाल्या की, चांगली गोष्टी आहे. मला तर आनंद आहे. एखाद्या व्यक्तीला जर असं वाटतं असेल तर ती चांगलीच गोष्ट आहे. जनतेचे एवढं प्रेम मिळत असेल, तर तीही चांगली गोष्ट आहे. आजही मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहे, असे ते म्हणतात, यावर हसत पंकजा म्हणाल्या की, जनतेच्या मनातील हा शब्द तुम्ही खेचू शकत नाही, अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली.
▪️स्वप्नरंजनातून बाहेर पडा, कॉंग्रेसची कोपरखळी.
भाजप सत्तेवरून पायउतार होऊन दोन वर्ष झाली तरी देवेंद्र फडणवीस यांना आजही तेच मुख्यमंत्री असल्याचा भास होत आहे. दोन वर्षापासून फडणवीस हे विधानसभेचे विरोधी पक्षनेते आहेत हे वास्तव त्यांनी अजूनही स्विकारलेले नाही. पण स्वप्नरंजनातून बाहेर पडून फडणवीस यांनी वास्तव स्विकारले पाहिजे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटले आहे.
भारतीय जनता पक्षात कोण जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहे तर कोणाला आपलाच नंबर आहे असे वाटते पण देवेंद्र फडणवीस स्वप्नातही मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सोडायला तयार नाहीत. यातून भाजपातील मुख्यमंत्रीपदाच्या इच्छुकांनी काय तो बोध घ्यावा. जनतेचा महाविकास आघाडीवर विश्वास असून जनता भाजपला कायम विरोधी पक्षातच पाहू इच्छिते, त्यामुळे त्यांनी मनाची तयारी करून वास्तव स्विकारावे अशी कोपरखळीही लोंढे यांनी लगावली.