Take a fresh look at your lifestyle.

स्वतःला स्वतःची ओळख होत नाही !

प्रत्येकाला जगाची ओळख करून घेण्यातच जास्त रस असतो.

मरेपर्यंत स्वतःची ओळख होईल की नाही हे सांगताही येत नाही. कारण ते सहज ध्यानात येईल असे नाही.कारण आपण सतत मायेच्या प्रभावाने इतरांच्या आयुष्यात डोकावत रहातो.किंवा हे जग नेमकं कसं आहे?ते शोधण्यातच धन्यता मानतो.बाहेरच्या गुढ गोष्टी जाणण्यात फारच रस आहे. त्यामुळे आमच्याकडे भौतिक,भौगोलिक,वैज्ञानिक ज्ञानाची रेलचेल आहे.पण आपण स्वतः कोण आहोत याचं मात्र ज्ञान नाही. हे वास्तव आहे. आणि त्याचं आम्हाला काही वाईट वाटतही नाही. अनावश्यक ज्ञानच आमचं जीवन आहे असं वाटतं.
माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,आपणचि ज्ञानस्वरुप आहे।तें गेलें हे दुःख न वाहे।कीं विषयज्ञाने होयें।गगना एवढा।।१४/१५३ आपण ज्ञानस्वरुप आहोत याचा आम्हाला विसर पडतोच.पण त्याचं आम्हाला वाईट वाटत नाही अथवा दुःख होत नाही. उलट विषयज्ञानानेच गगनाएवढा आनंद होतो.वास्तविक कोणत्याही विषयाचं ज्ञान पुर्णत्वास नेत नाही. आपण ज्ञानस्वरुप आहोत याचा बोध होणं म्हणजे पुर्णत्व आहे.स्वतःची ओळख जगणं सुसह्य करते.
मी कोण आहे?एक शरीर?कुणाचा बाप,आई,मुलगा,मुलगी…मला ज्या नावाने हाक मारली जाते.ते नाव म्हणजे मी आहे का? एका व्यक्तीला बाबा नावाने हाक मारायचे वयपरत्वे ते मृत्यू पावले.त्याच्या पार्थिवाजवळ बसून लोक दुःखावेगाने रडत होते.बाबा गेले,बाबा गेले असं म्हणत होते.पण बाबा तर समोर होते.एकजण म्हणाला बाबा तर आपल्या समोर आहेत, त्यावर एकजण म्हणाला,ही बाबांची डेडबॉडी आहे. बाबा गेले आपल्याला सोडून.
 होय…सज्जनहो गेले तेच बाबा होते.ते जाताना दिसले नाहीत पण गेले हे प्रत्येकाने मान्य केले. तेच खरं ज्ञानस्वरुप आहे. आपलीच माणसं आपलं शरीर जाळण्यासाठी तयार असतात.कारण ते हे जाणतात की हे शरीर म्हणजे ते नव्हे.पण हे मृत्यूनंतर कळेल का?आपण जीवंतपणीच हे स्विकारले पाहिजे.आपण एकटे आलो आहोत आणि एकटेच जाणार आहोत.या दरम्यान मला माझी ओळख झाली तर जगण्याचं सुत्रच बदलेल.देह देवाचे कारणी हे समजेल.मग शिल्लक जे रहाते ते ज्ञानस्वरुप आहे. तिथे फक्त आनंद आहे. कोणताही प्रसंग दुःखी करण्या इतका बलवान नाहीच.ज्ञानबोधाने आम्हाला फसवणारी माया आकळते.मग शिल्लक रहाते ते केवळ ब्रम्ह.तेच आमचं खरं स्वरूप आहे.
प्रापंचिकाने माया ब्रम्हाची उकल करून प्रपंच नेटका कसा करावा हे शिकले पाहिजे.हेच धार्मिक तत्वाचं बीजीकरण आहे. परमार्थ हा प्रदर्शनाचा विषय नाही. तो आपल्या बुद्धीने केलेला समृद्धीचा सरस,सात्विक विचार आहे.
रामकृष्णहरी