Take a fresh look at your lifestyle.

विश्वनाथ कोरडेंवर चंद्रकांतदादांचा ‘विश्वास’ !

प्रदेश भाजपाच्या निमंत्रित सदस्यपदी निवड !

पारनेर : भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष विश्वनाथ कोरडे यांची पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या निमंत्रित सदस्य पदी निवड करण्यात आली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुंबईतील नरिमन पॉइंट येथील पक्ष कार्यालयात नियुक्तीचे पत्र दिले. यावेळी जिल्ह्याचे माजी अध्यक्ष तथा प्रदेश कार्यकारणी सदस्य प्रा. भानुदास बेरड हे उपस्थित होते. दरम्यान, श्री. कोरडे यांच्या अनुभवाचा लाभ संघटनात्मक वाढीसाठी उपयुक्त ठरेल असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.
पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे विश्वनाथ कोरडे हे सन 2013 च्या जिल्हा परिषद निवडणुकीत वाडेगव्हाण गटामधून अपक्ष निवडून आले होते. या काळात त्यांनी गटातील जलसंधारण व शैक्षणिक क्षेत्रात भरीव काम केले. तालुक्याच्या पाण्याच्या प्रश्नावरही त्यांचा मोठा अभ्यास आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील शेतीच्या पाण्यासंदर्भात त्यांनी कृती आराखडाही तयार केलेला आहे.
 जिल्हा परिषदेमध्ये अपक्ष निवडून येऊनही त्यांनी राष्ट्रवादीला साथ दिली होती मात्र, पक्षात सन्मानाची वागणूक न मिळाल्याने विद्यमान जिल्हा परिषद सदस्य असतानाच त्यांनी भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, खासदार स्व.दिलीप गांधी यांच्या उपस्थितीत सन 2015 ला नगर येथे भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला होता.
तालुक्यात त्याकाळी भाजपाची फारशी ताकद नसतानाही तालुकाध्यक्ष विश्‍वनाथ कोरडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक लढविण्यात आली. पुढे श्री. कोरडे, वसंत चेडे यांनी पारनेर नगरपंचायतीमध्ये भाजपचे उमेदवार स्वबळावर निवडणूक रिंगणात उतरविले होते. या निवडणुकीत अपयश आले असले तरी भाजपाचे चिन्ह मात्र शहरातील मतदारांपर्यंत पोहोचविण्यात ते यशस्वी झाले.
भाजपा पक्ष संघटनेत बुथ कमिटी व सदस्य नोंदणीला महत्त्व असते श्री.कोरडे तालुकाध्यक्ष असताना त्यांनी बूथ कमिट्या सक्षम करून सदस्य नोंदणी अभियानही तालुकाभरात राबविले गेले. जवळपास 90 टक्के बुथ कमिटया, सदस्य नोंदणीचे काम त्यांनी पूर्ण केले. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची प्रदेश भाजपच्या निमंत्रित सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
आपण तालुकास्तरावर केलेले पक्ष संघटनेतील कार्य व अनुभव उल्लेखनीय असून भारतीय जनता पक्षाच्या वृद्धी करिता आपला अनुभव संघटनात्मक वाढीसाठी उपयुक्त ठरेल असा विश्वास प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नियुक्ती पत्रात व्यक्त केला आहे. दरम्यान आगामी कृषी उत्पन्न बाजार समिती, नगर पंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर श्री. कोरडे यांची निवड महत्त्वपूर्ण मानली जात आहे. त्यांच्या निवडीचे जिल्ह्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले आहे तर तालुक्यातून ही या निवडीबद्दल श्री. कोरडे यांचे अभिनंदन होत आहे. पक्ष संघटनेने आपल्या कामाची दखल घेवून पदाच्या माध्यमातून पावती दिली असून आगामी काळातही पक्ष संघटनेच्या वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही श्री. कोरडे यांनी निवडीनंतर बोलताना दिली.