Take a fresh look at your lifestyle.

‘या’ आमदारांची आमदारकीच धोक्यात !

हायकोर्टाने दिले निवडणूक आयोगाला आदेश.

अमरावती : जिल्ह्यातील बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या खर्चाच्या मर्यादेपेक्षा जास्त खर्च केल्यामुळे त्यांच्या विरोधात राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल आहे. मात्र, या तक्रारीवर कुठलीही कारवाई अद्याप झाली नाही. याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य निवडणूक आयोगावर ताशेरे ओढत या प्रकरणात त्वरीत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या या आदेशामुळे आमदार रवी राणा यांची आमदारकी धोक्यात येण्याची शक्यता आहे.
आमदार रवी राणा यांना लोकप्रतिनिधित्व कायद्यातील कलम 10-ए अंतर्गत अपात्र ठरविण्यासाठी सुरू करण्यात आलेली कारवाई तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी दिले. न्यायालयाने हे आदेश सोमवारी भारतीय निवडणूक आयोगाला दिले आहेत.

रवी राणा हे बडनेरा विधानसभा मतदार संघाचे आमदार असून त्यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मर्यादेपेक्षा जास्त खर्च केल्याचा आरोप आहे. उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे आता रवी राणा यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार आता निवडणूक आयोग त्यांना अपात्र ठरविण्याची कारवाई करणार आहे.
यासंदर्भात शिवसेनेचे कार्यकर्ते सुनील खराटे व सुनील भालेराव यांनी रवी राणा यांच्याविरोधात याचिका दाखल केली होती. त्यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सुनावणी झाली. सुनील शुक्रे व अनिल किलोर यांच्यासमक्ष ही सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान आमदार राणा यांना 8 ऑक्टोबर 2021 रोजी लोकप्रतिनिधित्व कायद्यातील कलम 10-ए अंतर्गत कारवाई सुरू करण्याबाबत नोटीस जारी करण्यात आहे, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली. तसेच ही कारवाई सहा महिन्यात पूर्ण केली जाईल, असेही निवडणूक आयोगाने न्यायालयाला सांगितले. त्यानंतर आयोगाची बाजू ऐकून घेतल्यानंतर राणा यांना अपात्र ठरविण्यासाठी सुरु करण्यात आलेली कारवाई पूर्ण करण्याचे निर्देश देऊन ही याचिका न्यायालयाने निकाली काढली