मुंबई :राज्यात मान्सूनच्या परतीचा प्रवास आजपासून सुरू झाला आहे. काल विदर्भातील काही जिल्ह्यातून मान्सून परतला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पावसाचे शेवटचे काही दिवस उरले आहेत. हवामान विभागाने परतीच्या पावसासाठी १२ जिल्ह्यात यलो अलर्ट दिला आहे. त्यात नगर व नाशिक जिल्ह्यांचाही समावेश आहे. मुंबईच्या हवामान खात्याचे वरिष्ठ शास्त्रज्ञ के. एस. होसलीकर यांनी टि्वट करत ही माहिती दिली.
यंदाचा मान्सून हंगाम 30 सप्टेंबर रोजीच संपला असून मान्सून परतीचा प्रवास सुरु झाला आहे. राजस्थानातून 6ऑक्टोबरच्या सुमारास परतीचा पाऊस सुरु झाला.
हवामान खात्याने पुढील दोन दिवस राज्यात काही जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबईसह, पुणे, ठाणे, नाशिक, पालघर, अहमदनगर, सातारा, सांगली कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या बारा जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे. पुढील काही तासांतच याठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकणात पावसाचा जोर अधिक असणार आहे.
दोन दिवस पावसाची शक्यता
अरबी समुद्रातील चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पुढील दोन दिवस मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
त्यानंतर पाऊस विश्रांती घेणार आहे. सध्या विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक भागांत पावसाने विश्रांती घेतली आहे. या भागात पुढील दोन दिवस तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. त्यानंतर या दोन्ही विभागांमध्ये हवामान कोरडे होणार आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मात्र आणखी दोन दिवस विजांच्या कडकडाटात पावसाचे सावट कायम राहणार आहे. काही भागांत जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. दोन दिवसांनंतर मात्र या विभागांतही पाऊस विश्रांती घेणार आहे.
▪️धरणे झाली ‘ओव्हरफ्लो’
यंदा तीन महिने सरासरीपेक्षा कमी झालेला पाऊस सप्टेंबरमध्ये मुसळधार कोसळला. या पावसामुळे राज्यातील बहुतांशी धरणे फुल्ल झाली. राज्यात सरासरी पेक्षा 19 टक्के पाऊस जास्त झाला.ओल्या दुष्काळाचे संकट अनेक जिल्ह्यात निर्माण झाले आहे. आता मान्सूनचा राजस्थानपासून परतीचा प्रवास सुरु होणार आहे. महाराष्ट्रातून तो आज परतीच्या वाटेला निघणार आहे. मान्सून दरवर्षी 17 सप्टेंबरच्या सुमारास परतीचा प्रवासाला निघतो. मात्र यंदा 6 पासूनऑक्टोबर तो सुरु होत आहे.