मुंबई : शिवसेनेचा दसरा मेळावा टक्के होणारच आहे, असे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. शिवसेनेचा दसरा मेळावा हा मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर होत असतो. मात्र कोरोना संकटामुळे यंदा हा मेळावा शिवाजी पार्कऐवजी माटुंगा येथील षण्मुखानंद हॉलमध्ये होणार आहे, असे खा.संजय राऊत यांनी सांगितले.
शिवसेनेचा दसरा मेळावा शंभर टक्के होणार आहे. षण्मुखानंद हॉलमध्ये त्याच जोरात हा मेळावा होईल. शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मार्गदर्शन करतील आणि देशाच्या राजकारणाला दिशा देण्याचा प्रयत्न करतील, असे संजय राऊत म्हणालेत.
यंदाचा दसरा मेळावा ऑनलाईन होणार नाही. नियम आणि संकेतांचं पालन करुन दसरा मेळावा आयोजित करण्याची तयारी सुरु आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची देखील तीच इच्छा आहे, असे खा.राऊत यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर सेनेचा पहिलाच दसरा मेळावा गतवर्षी पार पडला.या मेळाव्यावर कोरोनाचे सावट होते. याचमुळे शिवतीर्थावरची भव्य सभा टाळून सेनेचे मोजके नेते, महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा मेळावा पार पडला होता.
शिवसैनिकांसाठी हा मेळावा ऑनलाईन देखील दाखविण्यात आला होता.याच मेळाव्यात मुख्यमंत्रिपदाची झूल बाजूला सारुन उद्धव ठाकरेंनी शिवसेना पक्षप्रमुख म्हणून भाषण करताना भाजपवर आसूड ओढले होते.