Take a fresh look at your lifestyle.

अमृता फडणवीस,रूपाली चाकणकरांचे रंगले असेही ट्वीट युद्ध !

मुंबई : लखीमपूर हिंसाचाराचा निषेध म्हणून आज सत्ताधारी महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यात सर्व ठिकाणी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं. यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केंद्र सरकार आणि भाजपवर जोरदार टीका करण्यात आली.

दरम्यान, आजच्या महाराष्ट्र बंदवरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला खोचक टोला लगावलाय. तर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी अमृता फडणवीसांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय.
अमृता फडणवीस या सक्रीय राजकारणात नसल्या तर त्या ट्वीटर किंवा अन्य माध्यमातून सातत्यानं महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना पाहायला मिळतात. लखीमपूर हिंसाचार प्रकरणावर महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदवरही अमृता फडणवीसांनी टीका केलीय. आज वसुली सुरु आहे की बंद? असा खोचक सवाल करत महाविकास आघाडीला डिवचण्याचा प्रयत्न अमृता फडणवीस यांनी केलाय.

अमृता फडणवीसांच्या या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. ‘वहिनींच्या गाण्यात सुरांचा जसा ताळमेळ नसतो तसं त्यांच्या बोलण्यात सुद्धा आजकाल काही ताळमेळ नसतो?? संवेदनाहिन मनाचं आणि अर्धवट ज्ञानाचं परफेक्ट कॉम्बिनेशन म्हणजे अमृता वहिनी’, असं ट्वीट चाकणकर यांनी केलंय.