Take a fresh look at your lifestyle.

आ.निलेश लंके यांच्याकडून अतिवृष्टी व गारपीटग्रस्त भागाची पाहणी !

तातडीने पंचनामे करण्याची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी.

पारनेर : गेल्या आठ ते दहा दिवसांपासून पारनेर तालुक्यात परतीच्या पावसाने तालुक्यातील अनेक भागात अतिवृष्टी व गारपीट मोठ्या प्रमाणात झाली असून खरीप हंगामातील कांदा टोमॅटो सोयाबीन बाजरी मका या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कोरोनाच्या आर्थिक संकटात शेतकरी सापडला असताना पारनेर तालुक्यातील शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त केले आहे. त्यामुळे पारनेर तालुक्यातील बहुतांशी भागात शेतीमालाच्या झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावे अशी मागणी आमदार निलेश लंके यांनी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याकडे केली आहे.तर दुसरीकडे अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकाच्या नुकसानीचे पंचनामे होऊन त्यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे.
आमदार निलेश लंके यांनी काल (रविवारी) गुरेवाडी व परिसरातील तसेच ढवळपुरी व वाघवाडी परिसरातील थेट शेतीच्या बांधावर जाऊन शेतीमाल नुकसानीची पाहणी केली.जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मागील काही दिवसात संपूर्ण राज्यात पावसामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आपला अहमदनगर जिल्हा देखील त्याला अपवाद नाही. आपल्या जिल्ह्यातील जवळपास सगळ्याच भागात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांची कांदा पिके जमिनदोस्त झाली आहेत. फळबागा पावसाने झोडल्या गेल्या आहे. तसेच सोयाबीन, मका, ज्वारी, इत्यादी पिके पावसाने पूर्णपणे खराब झाले आहेत.
शेतकऱ्यांच्या नुकसानीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून पिकांच्या झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी यासाठी आपण विशेष लक्ष घालून संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत. तर दुसरीकडे प्रभारी तहसीलदार गणेश आढारी यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून ढवळपुरी, वाघवाडी ,वासुंदे गुरेवाडी या परिसरात अतिवृष्टीमुळे नुकसान झाले तातडीने कामगार तलाठी व कृषी अधिकारी यांना पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत.
यावेळी विश्वनाथ वाघ, संदीप वाघ,भाऊसाहेब देवराम वाघ, हरिभाऊ वाघ, किसन वाघ, लहानु वाघ, पार्वती बाबा वाघ,बाबुराव शेळके, सदाशिव वाघ,चेतन शिंदे, भूषण वाघ, राजाराम वाघ, काशिनाथ दाजी वाघ यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.