Take a fresh look at your lifestyle.

सेनेचा राष्ट्रवादीला थेट इशारा ! “डिवचू नका, नाहीतर सोडणार नाही !”

राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातच शिवसेना नेते झाले आक्रमक.

शिरुर / जुन्नर : शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत आणि उपनेते रवींद्र मिर्लेकर यांनी पुणे जिल्ह्याच्या दौरा करताना शिरुर लोकसभा मतदारसंघ पिंजून काढलाय. खेड-जुन्नर या एकेकाळच्या सेनेच्या बालेकिल्ल्यात सध्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत. तर शिरुर लोकसभा मतदारसंघातही डॉ. अमोल कोल्हें यांनी शिवाजीराव आढळराव पाटलांना खासदारकीचा चौकार मारु दिला नाही. शिवसेनेला हीच मोठी खंत आहे. त्यामुळेच खा. राऊत-मिर्लेकर हे सेना नेते आपल्या भाषणांत राष्ट्रवादीला इशाऱ्यावर इशारे देत आहेत. खेडमध्ये बोलताना खासदार राऊत यांनी राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांना थेट आव्हानच दिले तर उपनेते मिर्लेकरांनी शिरुरच्या आमदारांना इशारा दिलाय. डिवचू नका, नाहीतर सोडणार नाही, अशा शब्दात त्यांनी शिरुरचे आमदार अशोकबापू पवार यांना सज्जड दम भरलाय.

▪️राष्ट्रवादीला दिले इशाऱ्यावर इशारे.

शिरुर लोकसभा मतदारसंघ हा एकेकाळचा शिवसेनेचा अभेद्य गड म्हणून ओळखला जातो.आढळराव पाटील यांनी येथूनच खासदारकीची हॅट्रिक केली होती. मात्र 2019 च्या लोकसभा निवडणुकीत चौकार मारण्यापासून त्यांना राष्ट्रवादीच्या डॉ.अमोल कोल्हे यांनी रोखले. तसेच विधानसभा निवडणुकीत देखील खेड, जुन्नर मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले. राज्यात जरी महाविकास आघाडीचे सरकार असले तरी शिरुर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी आणि शिवसेनेत मोठी धुसफूस सुरूच आहे. याच पार्श्वभूमीवर खा.राऊत यांचा पुणे-शिरुर दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. अपेक्षेप्रमाणे शिवसेना नेते राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात आक्रमक झाले आहेत तसेच राष्ट्रवादीला इशाऱ्यावर इशारे देत आहेत.

▪️वाघानं झेप घेतली तर सोडणार नाही.

काल आम्ही खेडच्या मोहिते पाटलांना आव्हानं देऊन आलोय. येथल्या शिरुरच्या आमदारांनाही सांगतोय विनाकारण डिवचू नका, वाघानं झेप घेतली तर सोडणार नाही, असा थेट इशाराच शिवसेना उपनेते रविंद्र मिर्लेकर यांनी शिरुर हवेलीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अशोक पवार यांना दिला.

▪️वळवळ करणाऱ्या किडयांचा बंदोबस्त करु.

राष्ट्रवादी काँग्रेसचे खेडचे आमदार दिलीप मोहिते यांच्यावर संजय राऊत यांनी खेडमध्ये बोलताना हल्ला चढवला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे महाविकास आघाडी सरकारचे मार्गदर्शक आहेत. आम्ही त्यांचा आदर करतो. मात्र खेडमध्ये जे किडे वळवळ करत आहेत त्यांचा बंदोबस्त आम्ही करु, असा इशाराच संजय राऊत यांनी दिला.

▪️’या’ मतदार संघात पुन्हा शिवसेनेचा भगवा.

खासदार संजय राऊत यांनी जुन्नरमध्ये बोलताना उपस्थित सेना कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य फुलवलं तसेच शिवसेना नेत्यांच्या मनातली बात खुलेआम बोलून दाखवली. कार्यकर्त्यांनो कामाला लागा, असे आदेश देतानाच शिरुर आणि जुन्नर मतदारसंघात शिवसेनेचा भगवा फडकेल, असा विश्वास वाटतो, असे खा. राऊत म्हणाले. एकप्रकारे त्यांनी खा. अमोल कोल्हे आणि आमदार अतुल बेनके यांचा पराभूत करण्याचा मनसुबाच यावेळी बोलून दाखवला. दरम्यान, यामुळे राज्यातील महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या शिवसेना -राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत धुसपूस पुन्हा एकदा चव्हाटयावर आली आहे.