Take a fresh look at your lifestyle.

आमदार निलेश लंकेंनी फुंकले जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणूकीचे रणशिंग !

म्हणाले, सर्व असंतुष्ठांना चारीमुंडया चीत करणार !

पारनेर: आत्तापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणि कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे भविष्यातही अनेक प्रवेश होणार आहेत आपल्याला सर्वांना बरोबर घेऊन चालायचा आहे. येत्या काळात जिल्हा परिषद,पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत,राज्यात काय होईल ते होईल आपल्याविरोधात मात्र सर्व असंतुष्ट आत्मे राहणार आहेत त्या सर्वांना आपण चारीमुंड्या चीत करणार असल्याचे प्रतिपादन आमदार निलेश लंके यांनी केले.
पारनेर तालुक्याची जीवनदायिनी असणाऱ्या मांडओहोळ व काळू धरण तुडूंब भरल्याने आमदार लंके यांच्या हस्ते आज जलपूजन करण्यात आले. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना आमदार लंके बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे विविध पदाधिकारी व परिसरातील गावचे कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी बोलताना आमदार लंके म्हणाले की, विधानसभेच्या निवडणुकीत कोणी आपल्या बरोबर नसेलही विरोधात काम केले असेल त्यावेळी आपण त्यांची सेवा करण्यास कमी पडलो असून आता आपल्यासोबत चांगल्या विचारांची लोक येणार असतील.दुसऱ्यांच्या खिशावर डोळा ठेवणारे नसतील अशा लोकांना आपण बरोबर घेणार असल्याचेही आमदार लंके यांनी सांगितले.
आ. लंके म्हणाले, “मी निधी मंंजुर करून आणतोय, माझ्या परस्पर कोणीही बोर्ड लावतंय, नारळ फोडतंय आणी पेपरला बातमी छापून आणली जातेय ! याला काय अर्थ आहे ? लोक वेडे आहेत का ? पैसा राज्य सरकारचा, मी सरकारचा प्रतिनिधी. त्यामुळे माझ्याच माध्यमातून निधी येणार ना ? कामाचा शुभारंभ करताना अधिकारी नाहीत, ठेकेदार नाहीत हे लोकांना कळत नाही का ? तालुक्यात असंच चोरट्या, भामट्या सारखे बोर्ड लावायचे, पळत पळत जावून नारळ फोडायचा आणी घाई घाईने गाडीत बसून निघून जायचं असा कार्यक्रम सध्या सुरू आहे”.
 “जलपुजनाचीही अशीच स्पर्धा सुरू झाली आहे. सकाळी एक गट, दुपारी दुसरा गट तर संध्याकाळी तिसरा गट जलपुजन करीत आहे. आरे हे काय चाललं आहे ? फक्त पेपरबाजीसाठीच ना ?तुमचं समाजासाठी काय योगदान आहे ? असा सवाल करीत आ.लंके म्हणाले की, तुम्ही जे काही समाजासाठी केलं आहे ते स्वतःच्या टक्केवारीसाठीच केलंय दुसरं काय ? वेगळं काय आहे ? तुम्ही जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जगजाहिर बाजार मांडलाय ! कोणी १० टक्के देतो का ? कोणी १३ टक्के देतो का ? तुला काम देतो असे सांगितले जात आहे. निलेश लंके दोन वर्षे झालीत आमदार झालाय. असं कधी कानावर आलयं का कोणत्या अधिकाऱ्याला दोन रूपये मागितले म्हणून ? समाजासाठी काम करणारी आत्मीयता लक्षात येते. तालुक्यात सध्या हे भुछत्र उगवले आहेत ते दोन, चार महिन्यांमध्ये आपण भुईसपाट करणार आहोत”. असे आव्हान आ. लंके यांनी यावेळी बोलताना दिले.

आमदार झाल्यापासून सलग तिसऱ्यांदा आपण जलपुजन करीत आहोत. यापूर्वी अनेक वेळा हे धरण भरत नसे. विधानसभा निवडणूकीच्या निकालाच्या दिवशीच धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले. मतदासंघातील इंच ना इंच जमीन पाण्याखाली आणण्याचे अभिवचन मी दिले होते. त्यासाठी महत्वाकांक्षी योजना राबविण्यासाठी प्रयत्न सुरूच आहेत. मात्र आपण आमदार झाल्यानंतर समाधानकारक पाऊस होत आहे. इंच न इंच जमीन ओलिताखाली येत आहे यात मोठे समाधान आहे. मतदारसंघात पाण्याची लढाई सर्वात मोठी आहे. राळेगणसिध्दी, १५ गावांची कान्हूरपठार उपसा जलसिंचन योजना,पुणेवाडी, जातेगांव या योजनांसाठी आपण प्रयत्नशिल आहोत. विकासाची गंगा गावागावांत, घराघरात नेण्यासाठी आपण कटीबध्द असल्याचे लंके यांनी सांगितले.
जलपुजनाच्या कार्यक्रमास आपण प्रथमच नागरीकांची एवढी गर्दी पाहिल्याचे अशोक कटारीया यांनी आपल्या भाषणात सांगितले होते. तोच धागा पकडून आ. लंके म्हणाले, या मतदारसंघातील जनता भाग्यवान आहे. इथे मी सोडून सगळेच आमदार आहेत. त्यामुळे आमदाराचा प्रोटोकॉल म्हणून ते सगळे इथे आलेले आहेत. त्यांच्यामागे झेंडा धरायला कोणीतरी असावे म्हणून मी आल्याचे सांगत आ. लंके यांनी मिश्किली केली.
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचानामे करून भरपाई मिळण्याची मागणी प्रकाश गाजरे यांनी केली होती. त्यावर बोलताना आ. लंके म्हणाले, यासंदर्भात आपले जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणे झाले आहे. सर्वांचे पंचनामेे होतील, भरपाई देखील मिळेल. एकीकडे कोरोना व दुसरीकडे अतिवृष्टी या दोन्हीही संकटात सरकार आपल्या सोबत आहे. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणारे राज्यातील महाविकास आघाडीचे हे सरकार आहे. शेतकरी वर्गाने भरपाईबाबत निश्‍चिंत राहण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब तरटे,बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड, संचालक अशोक कटारिया, अ‍ॅड. राहूल झावरे, बापूसाहेब शिर्के,संजीव भोर, अशोक रोहोकले, डॉ.राजेंद्र आव्हाड,शिवाजी व्यवहारे, बाळासाहेब खिलारी, अरूण आंधळे, व्हि. एस. उंडे, अंकुश पायमोडे, शिशिकांत आंधळे, भागाजी गावडे, सुखदेव चितळकर,संदीप चौधरी, डॉ.बाळासाहेब कावरे, श्रीकांत चौरे, गुलाबराव पाटील, अशोक पवार, रामदास दाते, सोमनाथ आहेर, लहू धुळे, झुंबराबाई आंधळे, वर्षा मुळे, जगदाळे सर, जनाबाई आंधळे, प्रकाश गाजरे, पांडूरंग जाधव, उमाताई बोरूडे, मयुरी औटी, दिपाली औटी, सुनिता आहेर,पियुष गाजरे, पोपट गुंड, अजित भाईक, बाळासाहेब शिंदे, सुभाष शिंदे, गुलाब राजे भोसले, नितिन दावभट तसेच जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.