नेवासा : वाहतुक संघटनेच्या पदाधिकाऱ्याला पैशांची मागणी करणाऱ्या ‘त्या’ पोलिस कर्मचाऱ्याची अखेर पारनेरला बदली करण्यात आली आहे.
दोन दिवसांपूर्वी पोलिस कर्मचारी व वाहतूक संघटनेचे पदाधिकारी यांच्या संभाषणाची एक ऑडीओ क्लीप सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली होती. त्यानंतर पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी ही बदली केली आहे. याबाबत शुक्रवारी आदेश काढला आहे.
या ऑडीओ क्लीपमधील पोलीस कर्मचारी एका प्रवासी वाहतूक संघटनेच्या उपाध्यक्षावर खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत असल्याचे या संभाषणातून समोर आले आहे. एकूण तेरा मिनिटांच्या या संभाषणातून वाहतूक शाखेत चालणारी हप्तेखोरी उघड झाली आहे.
संबंधित पोलिस कर्मचार्याने पैशांची मागणी करून धमकी दिल्याच्या घटनेनंतर नेवासा तालुका टँक्सी व रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस अधीक्षक पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले होते.
अधीक्षक मनोज पाटील यांनी व्हायरल ऑडिओ क्लिप संदर्भात नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. तो अहवाल सादर झाल्यानंतर अधीक्षक पाटील यांनी बदली बाबत तातडीने आदेश काढला आहेत.
अवैध प्रवासी वाहतूक व पोलिसांचे आर्थिक व्यवहार घडत असल़्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता पोलिस खात्याने सुरु असलेल्या अवैध वाहतुकीवर कारवाई करावी व हप्तेखोरी होत नसल्याचे स्पष्ट करावे, अशी मागणी होत आहे.