Take a fresh look at your lifestyle.

बाबो ! ‘या’ पतसंस्थेत झाला दोन कोटींचा गफला !

संचालकांच्या मालमत्तेवर लागली टाच.

नगर: जिल्हा हे सहकाराचे जाळे असल्याने गेल्या तीन दशकापासून सहकारी पतसंस्था चळवळही नावारूपाला आली आहे मात्र,अलिकडच्या काही वर्षांपासून काही संस्थांमध्ये आर्थिक गडबडी सुरू झाल्याने ही चळवळ बदनाम होवू लागली आहे.पतसंस्थेतील गैरव्यवहाराचा असाच प्रकार नेवासा तालुक्यातील सोनई येथे घडला आहे.
सोनई येथील व्यंकटेश ग्रामीण पतसंस्थेतील एक कोटी ९३ लाखांच्या गैरव्यवहार प्रकरणी पतसंस्थेच्या पाच संचालकांची शेती व प्लॉट जप्तीचा आदेश उपविभागीय दंडाधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी दिला आहे.
व्यंकटेश पतसंस्थेच्या गैरव्यवहार बाबत सुविधा सुविजय सोमाणी रा. बेलापूर (ता. श्रीरामपूर) यांनी सोनई पोलिस ठाण्यात सन २०१८ मध्ये फिर्याद दिल्यानंतर व्यवस्थापक शामसुंदर शंकर खामकर, कर्मचारी गणेश हरीभाऊ गोरे व गणेश अंबादास तांदळे यांना अटक करून सर्व संचालकावर गुन्हा दाखल झाला होता. ठेवीदाराच्या आंदोलनानंतर ४ जून २०२१ रोजी संचालक गोपाल कडेल व तेजकुमार गुंदेचा यांना अटक करण्यात आली.
मुदत संपूनही ठेवीदाराच्या ठेवी देत नसल्याने ठेवीदाराचे रक्षण म्हणून शासनाच्या वतीने जप्तीचा आदेश काढण्यात आला आहे. आदेशात संचालक अभय शांतीलाल चंगेडिया (शेतजमीन), आनंद अशोकलाल भळगट (प्लॉट, व शेतजमीन), तेजकुमार हिरालाल गुंदेचा (प्लॉट), गोपाल रुपचंद कडेल (प्लॉट) व लक्ष्मण हरिभाऊ राशीनकर ( शेतजमीन) यांची मालमत्ता जप्त केल्याचे आदेश देण्यात आले आहेत.