Take a fresh look at your lifestyle.

उद्या ‘महाराष्ट्र बंद’ची हाक !

अत्यावश्यक सेवा सुरू राहणार.

मुंबई : उत्तर प्रदेशातील लखीमपूर हिंसाचाराचे पडसाद महाराष्ट्रातही उमटत आहेत. या हिंचाराबद्दल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत खेद व्यक्त करणारा ठराव मंजूर करण्यात आला. त्याचबरोबर या हिंसाचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने सोमवारी,११ ऑक्टोबरला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली. या बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत.

लखीमपूर खेरी येथे रविवारी आंदोलक शेतकऱ्यांच्या जथ्यात मोटार घुसवण्यात आल्यानंतर हिंसाचार उफाळला. त्यात चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा बळी गेला असून, या घटनेचे देशभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतही लखीमपूर हिंसाचाराचे पडसाद उमटले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी याबाबतचा मुद्दा उपस्थित करीत केंद्र आणि उत्तर प्रदेशातील भाजप सरकारच्या शेतकरीविरोधी भूूमिकेचा निषेध करण्याची मागणी केली. त्यांच्या भूमिकेला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी अनुमोदन दिले. त्यानुसार लखीमपूर खेरी येथील हिंसाचारात झालेल्या शेतकऱ्यांच्या मृत्यूबद्दल खेद व्यक्त करण्याचा ठराव करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सर्व मंत्र्यांनी दोन मिनिटे उभे राहून स्तब्धता पाळत मृत शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहिली.

लखीमपूरमधील घटनेच्या निषेधार्थ ११ ऑक्टोबरला ‘महाराष्ट्र बंद’ पुकारण्याचा निर्णय महाविकास आघाडीतील शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी घेतल्याचे जयंत पाटील, बाळासाहेब थोरात आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर सांगितले. बंदचा निर्णय सरकारने नव्हे तर तिन्ही पक्षांच्या आघाडीने घेतला असून, त्यात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन या नेत्यांनी केले.

केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी कायद्यांच्या विरोधात गेल्या वर्षभरापासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. यात अनेक शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यातच अतिवृष्टी, चक्रीवादळ यामुळे बळीराजा संकटात आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना धीर देण्याऐवजी केंद्र आणि उत्तर प्रदेशातील भाजप सरकार ज्या क्रूरतेने शेतकऱ्यांशी वागत आहे, त्याचा निषेध म्हणून ही राज्य बंदची हाक देण्यात आल्याचे सांगण्यात आले. लखीमपूरची घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे. शेतकऱ्यांचे शांततामय आंदोलन चिरडण्याचा हा प्रकार जनरल डायरच्या कृतीची आठवण करून देणारा असल्याची टीकाही या नेत्यांनी भाजपवर केली. बंददरम्यान अत्यावश्यक- जीवनावश्यक सेवा सोडून सर्व व्यवहार बंद राहतील, असे सांगण्यात आले.