Take a fresh look at your lifestyle.

विचार हेच कर्म आहे !

विचार लहरी जीवन प्रभावित करतात.

एकदा एका चंदन विक्री करणाऱ्या दुकानासमोर राजा थांबला त्याने त्या विक्रेत्याकडे पाहिले आणि प्रधानाला म्हणाला,मला या दुकानदाराला फाशी देण्याची इच्छा होत आहे. असं का वाटतय याचं उत्तर मात्र माझ्याजवळ नाही.प्रधानाने यावर विचार केला,मग त्याने वेशांतर करुन दुकानदाराशी सलगी केली.दोघांच्याही गप्पागोष्टी होऊ लागल्या.एक दिवस पुन्हा राजांची स्वारी त्या रस्त्याने आली.तेव्हा वेशांतर केलेला प्रधान दुकानातच होता.दुकानदार त्याला म्हणाला हा राजा केंव्हा एकदा मरतो आहे याची मी वाट पहात आहे. कारण त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी सर्वात जास्त चंदन लागेल.माझं सर्व कर्ज फिटेल.प्रधानाला उत्तर मिळालं होतं.दुष्ट भावाने तयार होणाऱ्या विचार लहरींचा हा प्रभाव होता.
सज्जनहो विचार हेच कर्म आहे.विचार निर्माण म्हणजे कर्मकृतीचं डिझाइन आहे. वाईट कर्म करताना सुद्धा अविचाराचं चर्वण व्हावं लागतं.त्याशिवाय कृती घडतच नाही. सात्विक अथवा वाईट विचारांच्या तरंगलहरी डोळ्यांना दिसत नाहीत. पण त्या अनुभवता येतात.एखाद्या दुःखद प्रसंगात आपण सहभागी झालात तर अनेक नातेवाईक,मित्र परिवार तेथे शोक करीत असतील तर आपोआप त्या दुःखाच्या तरंगलहरी आपली प्रसन्नता घालवतात.आणि एखाद्या सात्विक, आनंदी कार्यक्रमात आपण सहभागी झालो तर मन प्रसन्न होतं.
आपण सहज बोलता बोलता बोलुन जातो.इथं आलं की वेळ कसा जातो कळत नाही किंवा इथं आलं की निघावसच वाटत नाही.यामागचं राज काय आहे?तर तिथं असणारा सात्विक,आनंदी विचार करणारा लोकसमुह.त्याने त्या विचार तरंगलहरी अधिक बलवान झालेल्या असतात.तीर्थाटनाने प्रसन्नता लाभते

यामागचं गुपित हेच आहे.सकारात्मक उर्जेचा श्रोत जेवढा मोठा तेवढी प्रसन्नता मोठी.तसच नकारात्मक उर्जेचा श्रोत जेवढा मोठा तेवढी अप्रसन्नता म्हणजे आपल्यातही वाईट विचारांचं भुत शिरायला मोकळीक होते.आपले विचार आपलं भावविश्व प्रगल्भ आणि आनंदी करतात.
एखाद्या मित्राच्या सहवासात तुम्हाला ती सकारात्मक प्रसन्नता लाभत असेल तर तुम्ही भाग्यवान आहात.आपलही विचार प्रसारण सत्याधिष्टीत असलं की तयार होणाऱ्या तरंग लहरी दुसऱ्यालाही आनंद देतील.चंदनाची शितलता धारण करण्यासाठी म्हणजे सात्विक विचारांची सोबत अपरिहार्य आहे.
रामकृष्णहरी