Take a fresh look at your lifestyle.

सर्जा -राजाच्या उत्सवाचा सण ‘बैलपोळा’ !

'अशी' केली जाते बळीराजाकडून कृतज्ञता व्यक्त.

0

 

पारनेर : शेतकऱ्यांचा सखा, सोबती, प्रत्येक सुख दुःखात सहभागी असणारा, धन्यासाठी वर्षभर राबणाऱ्या सर्जा -राजाच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा सण साजरा केला जातो. श्रावण अमावास्येला पोळा साजरा करण्याची पद्धत महाराष्ट्रातील बहुतांशी भागात पूर्वापार चालत आलेली आहे.

श्रावण महिन्यातील प्रत्येक व्रत-वैकल्ये, सण-उत्सव यांना धार्मिक महत्त्व आहे, तसे ते शास्त्रीय, व्यवहारिक, नैसर्गिक, कृषी यादृष्टिने ते महत्त्वाचे आहेत.

महाराष्ट्रात बैलपोळयाचा हा सण आज (सोमवारी) साजरा होत आहे. याच दिवशी पिठारी अमावस्या आणि श्रावणातला शेवटचा पाचवा सोमवार आहे. यामुळे या दिवसाला अधिक महत्व प्राप्त झाले आहे. श्रावणी अमावास्येच्या दिवशी शेतकरीवर्ग पोळा हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतो. प्रदेशपरत्वे हा सण आषाढ महिन्यात मूळ नक्षत्र असलेल्या दिवशी किंवा श्रावण अथवा भाद्रपद महिन्याच्या अमावास्येला साजरा करतात. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये हा सण साजरा केला जातो. मात्र, परंपरा आणि मान्यतांनुसार, तिथी आणि वेळा भिन्न असतात. या सणाचे शेतकरीवर्गात विशेष महत्त्व आहे.

पोळा हा सण विशेषतः विदर्भात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश व तेलंगणा सीमाभागातही हा सण साजरा होतो. ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात. नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी या सणांबरोबरच सरत्या श्रावणात पिठोरी अमावस्येला संपूर्ण महाराष्ट्रात पोळा सण साजरा केला जातो.

पोळा सणाच्या आदल्या दिवशी बैलांना आवतण देण्यात येते. ओढा वा नदीवर नेऊन त्यांना आंघोळ घालतात. या दिवशी बैलाच्या खांद्याला हळद व तुपाने शेकतात. त्यांच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झूल, सर्वांगावर गेरूचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, गळ्यात कवड्या व घुंगरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे घालतात. गोड पुरणपोळी व सुग्रास अन्नाचा नैवेद्य दाखवतात.

पोळा सणाचा शेतकऱ्यांमध्ये मोठा उत्साह असतो. आपल्या ऐपतीप्रमाणे शेतकरी बैलांचा साजशृंगार करतात. बैल सजवितात व मिरवणुकीत भाग घेतात. या दिवशी महाराष्ट्रातील खेड्यांमधल्या प्रत्येक घराला आंब्याच्या पानांचे तोरण बांधले जाते. गावातल्या सर्व बैलजोड्या, वाजंत्री, सनई, ढोल, ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात. या वेळेस ‘झडत्या’ म्हणजेच पोळा सणाची गीते म्हणायची पद्धत आहे. शेतकरी वर्गात हा सण विशेष महत्त्वाचा मानला गेल्याने तो उत्साहाने साजरा करण्यात येतो. सध्याच्या कोरोना संकटाचा विचार करता मिरवणुका काढता येणार नाहीत, तरी शेतकरी वर्ग घरच्या घरी हा सण साजरा करतील, यात शंका नाही. परंतु जर इतर सर्व सुविधा सुरू केल्या गेल्या आहे आणि भाविकांचे श्रद्धा स्थान मंदिरे बंद आहेत असे सांगणाऱ्या, यावर आक्रमक झालेल्या श्रद्धाळूंनी मनावर घेतलं तर हा सण आणि येणारे पुढील सर्वच सण परंपरेनुसार साजरे होतील अशी शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.