Take a fresh look at your lifestyle.

पुण्यातील ‘त्या’ मालकाला लुटणाऱ्या चालकाला नगर जिल्ह्यातील पोलीसांनी पकडले.

आरोपींकडून ६० लाखांची रोकडही केली हस्तगत.

कर्जत – पुणे शहरातील हडपसर परिसरात एक धक्कादायक प्रकार घडल्याने पुणे हादरले होते.लघुशंकेसाठी व्यावसायिक मालक गाडीतून खाली उतरल्यानंतर गाडीतील ९७ लाखांची कॅश घेवून चालक फरार झाला होता. अखेर या चालकासह त्याच्या साथीदाराला पकडण्यात नगर जिल्ह्यातील कर्जत पोलीसांना यश मिळाले असून आरोपींकडून ६० लाखांची रक्कमही हस्तगत करण्यात आली.
या प्रकरणात येरवडा पोलीस स्टेशनमध्ये कलम ३८१ मधील पाहिजे असलेला आरोपी विजय महादेव हुलगुडे (रा. जामखेड) हा व त्याचे साथीदार पुणे येथून गेल्या ५ ऑक्टोबर रोजी ९७ लाख रुपये रोकड असलेली बॅग चोरी करून पसार झाले होते. आरोपीचा शोध येरवडा पोलीस व गुन्हे शाखा, पुणे शहर हे घेत होते. त्या अनुषंगाने येरवडा पोलीस आणि क्राईम युनिट ५ यांनी कर्जत पोलीस स्टेशनला या आरोपीचा शोध घेण्याबाबत कळविले होते. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी आरोपींचा शोध घेण्याबाबत सूचना दिल्या होत्या.
कर्जत पोलीस तपास करीत असताना हे आरोपी हे वीर (ता. पुरंदर, जि. पुणे) येथे असल्याची खात्रीशीर बातमी बातमीदाराकडून मिळाली. आरोपी कर्जत-जामखेड परिसरातील असल्याने व त्यांची गुन्ह्याची पद्धत माहिती असल्याने कर्जत पोलिसांनी तात्काळ हालचाली केल्या. क्राईम युनिट ५ च्या जवानांना वीर येथे येण्याबाबत कळविले. आरोपी हे वीर येथील शाळेजवळ लपून बसलेले होते.
आरोपी विजय महादेव हुलगुंडे (वय २५ वर्ष रा. काटेवाडी ता. जामखेड) व त्यास मदत करणारा आरोपी नाना रामचंद्र माने (वय २५ वर्षे, रा. मलठण ता. कर्जत) यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता आरोपी नाना माने पकडला गेला; परंतु दुसरा आरोपी विजय हुलगुंडे पळून गेला. त्यास कर्जत पोलिसांनी पाठलाग करून पकडले. आरोपींना कर्जत येथे आणून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली येरवडा पोलीस स्टेशनचे तपासी अंमलदार सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र आळेकर आणि क्राईम युनिट ५ चे सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे यांच्या ताब्यात देण्यात आले.
कर्जत आणि पुणे पोलिसांनी कसून चौकशी केली. आरोपींनी गुन्हा केल्याचे कबूल केले. पुणे पोलिस दलातील सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र आळेकर, प्रसाद लोणारे व त्यांचे पोलीस जवान यांनी कर्जत पोलिसांच्या मदतीने ६० लाख रुपये हस्तगत केले. कर्जत पोलिसांनी रक्कम हस्तगत करण्यासाठी पुणे पोलिसांना मदत केली.