Take a fresh look at your lifestyle.

खा.सुजय विखे पाटील संतापले म्हणाले, ‘त्या’ ठेकेदाराला धरून मारू का ?

खासदार म्हणून पाठपुरावा करून मी थकलोय,आता तुम्हीच सांगा...

शेवगाव : अहमदनगर – शिर्डी दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडल्याने भाजपाचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या रागाचा पारा चांगलाच चढला आहे.ठेकेदार काम करीत नाही, कोणाचे ऐकत नाही, अशी तक्रार खा. विखे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे जाहीरपणे केली होती. शुक्रवारी शेवगावमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात पुन्हा हा विषय निघाला. त्यावर खा.विखे पुन्हा संतप्त झाले. ‘खासदार म्हणून जे करायचे ते मी करीत आहे. यापुढे जाऊन त्या ठेकेदाराला धरून मारू का? असा उद्विग्न सवालच त्यांनी उपस्थितांना केला. यासंबंधी आपण सोशल मीडियावर मोहीम चालविणार असून याचे काय करायचे, हे आता लोकांनीच सूचवावे,’ असे आवाहनही त्यांनी केले.
शेवगाव शहरातील एका रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन डॉ. विखे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शेवगावच्या आमदार मोनिका राजळे याही उपस्थित होत्या. यावेळी जिल्ह्यातील खराब रस्त्यांचा विषय निघाला. त्यावर बोलताना डॉ. विखे आक्रमक झाले. विखे म्हणाले, कोविड संसर्गामुळे केंद्र सरकारने बहुतांश निधी लसीकरण आणि अन्य उपाययोजनांच्या कामाकडे वळविला आहे. रस्त्यांच्या कामासाठी आता पैसाच नाही. त्यामुळे सध्या तरी टोल लावल्याशिवाय रस्त्यांची कामे होऊ शकणार नाहीत.
टोलसाठी द्याव्या लागणाऱ्या पैशापेक्षा त्या रस्त्यामुळे झालेल्या फायद्याची किंमत मोठी असते. हे लक्षात घेतले पाहिजे. केंद्रीय मंत्री गडकरी यांनी जेव्हा सुरुवातीलाच टोल रस्त्यांची संकल्पना मांडली, त्यावेळी विरोध झाला होता. आता याचे फायदे लक्षात आले आहेत. त्यामुळे रस्ता हवा असेल तर आता टोलशिवाय पर्याय नाही. माझे हे म्हणणे कदाचित लोकांना पटणार नाही, त्यावर टीकाही होईल. मात्र, यावर कधी ना कधी गांभीर्याने विचार करावाच लागेल.
नगर -शिर्डी रस्त्याचे काम सध्या ठप्प झाले, त्याला जबाबदार ठेकेदार आहे. त्याच्याविरूद्ध तक्रारी केल्या. मात्र, उपयोग होत नाही. खासदार म्हणून मी आणखी काय करू शकतो? काम सुरू झाले तर तेथे उभा राहून ते करून घेऊ शकतो. मात्र, तो ठेकेदार जर यायलाच तयार नसेल तर कसे करायचे. मी खासदार म्हणून पाठपुरावा करून थकलो आहे. आता तुम्हीच सांगा, त्याचे काय करायचे? धरून मारायचे का? की गुन्हा दाखल करायचा? काय करायचे ते आता तुम्हीच सांगा.
त्यासाठी मी सोशल मीडियात मोहीम सुरू करणार आहे. तेथे तुम्ही आपली मते मांडा. त्या आधारे मी दिल्लीत पाठपुरावा करतो. मात्र, मी जो मार्ग सांगणार आहे, तो तुम्हाला मान्य असला पाहिजे. त्यामुळे आधीच तुमची मते घेत आहे,’ असेही डॉ. विखे म्हणाले.