Take a fresh look at your lifestyle.

सत्याला सतत परीक्षा द्यावी लागते !

त्यामुळे सत्याची झळाळी अधिकच वाढते.

सत्य मार्गात सतत संकटं आहेत.वारंवार त्रास आहे. हा त्रास,परीक्षा सत्य मार्गावर चालणाऱ्या व्यक्तिला तावून सुलाखून काढतात.त्यामुळे त्यांची खास जागा निर्माण होते.जगाला त्याची दखल घ्यावी लागते.ते संकटभोग भोगण्याची शक्ती त्यांच्यात त्या सत्यसंकल्पाने तयार होत असते.हे बळ देणारा साक्षात नारायणच आहे.
तुकोबाराय म्हणतात, सत्य संकल्पाचा दाता नारायण।सर्व करी पुर्ण मनोरथ।। सत्याला सहाय्य करणारा प्रत्यक्ष चक्रपाणी आहे पण हे विज्ञान युगात सिद्ध करता येत नाही. त्याच्या परिणामांची प्रतिक्षा करावी लागते.सत्यानं वागणारांना काय काय दिव्य करावी लागतात याची उदाहरणं देताना तुकोबाराय म्हणतात,
राजा शिबी चक्रवर्ती।कृपाळू दया भूति।।
तुळविले अंती।तुळें मास तयाचें।।
एक कबुतर ससाण्याच्या तावडीतून वाचण्यासाठी चक्रवर्ती राजा शिबीच्या मांडीवर येऊन बसले.ससाणाही त्याच्या पाठोपाठ आला.राजाने कबुतराचे रक्षण केले.ससाणा म्हणाला हे माझे भक्ष आहे मला द्या अन्यथा मी उपाशी मरेल.राजाने त्याचे रक्षण करण्यासाठी स्वतःची मांडी कापुन कबुतराच्या वजनाइतके मांस देण्यासाठी तराजूत कबुतर ठेवले आणि स्वतःचे मांस कापुन त्यात टाकले.पण मांस कमीच पडत राहिले.शेवटी राजा स्वतः तराजुत बसला.ही सत्याची परीक्षा होती.
कर्ण मोठा दानशूर होता.त्याची मृत्यूसमयी परीक्षा घ्यावी आणि कर्णाने त्यातही पास व्हावं ही सामान्य बाब नाही.
कर्ण भिडता समरंगणी।बाणीं व्यापियला रणीं।।
मागसी पाडोनी।तेथे दात तयाचे।।

कर्ण युद्ध भुमिवर बाणांनी जर्जर होऊन पडला आहे. त्याक्षणी भगवान श्रीकृष्ण याचकाच्या रुपात जाऊन दान मागत आहेत.किती कठीण प्रसंग आहे. मृत्यू दारात उभा आहे.आता कोणत्याही क्षणी मरण येणार आहे.पण कर्णाने आपल्या दातृत्वाला धक्का लागु दिला नाही. कर्णाचे दात सोन्याचे होते.याचकाने दाताची मागणी केली.फरपटत जाऊन दगड घेतला स्वतःचे दात पाडले.रक्त लागलेलं दान घेता येणार नाही असे त्या याचकाने म्हटल्यावर रक्तभंबाळ अवस्थेत कर्ण पाण्यापर्यंत गेला दात स्वच्छ धुवून याचकाच्या हाती दिले आणि मग त्याची प्राणज्योत मालावली.पुढे बळीराजा, श्रीयाळ,राजा हरिश्चंद्र, नलदमयंती यांची उदाहरणे तुकोबारायांनी दिली आहेत.यामधुन सत्याची धार किती दुधारी असते हेच प्रतित होते.
सज्जनहो आम्हालाही सत्याची कास धरून चालताना इतक्या टोकाच्या परीक्षा जरी द्याव्या लागत नसल्या तरी होणारा त्रास भयंकरच असतो.पण त्यातुन बाहेर पडल्यानंतर मिळणारं समाधान म्हणजे साक्षात भगवतदर्शन आहे. आपण सतत सत्याचीच वाट चोखाळायला हवी.प्रापंचिकाला हे सोपं नाही. कधीकधी भरकटणं स्वाभाविक आहे. पण भरकटलो याचं भान असणं म्हणजे कधीतरी जाग्यावर येण्याची शक्यता शिल्लक आहे असं म्हणता येईल. तुकोबारायांनी सांगितलेल्या कुणाचीही बरोबरी करता येणार नाही.पण आमचा छोटासा प्रयत्नही आम्हाला खूप आनंद देऊन जातो हे अगदी खरं आहे.
रामकृष्णहरी