Take a fresh look at your lifestyle.

मतदारसंघातील विकासकामांत नगर -पारनेर असा भेदभाव करीत नाही !

आमदार निलेश लंके यांचे प्रतिपादन.

नगर : माझ्या पारनेर- नगर विधानसभा मतदारसंघात पद्मभूषण अण्णासाहेब हजारे आणि पद्मश्री पोपटराव पवार यांचे वास्तव्य आहे.याचा मला अभिमान आहे.दोघांचे मला आशीर्वाद आहेत.दोघांचे मला नेहमीच मार्गदर्शन आणि मदत होत असते. त्यांच्या नावाला साजेसा विकास मतदार संघात करण्याचा माझा प्रयत्न आहे.विकास कामे करताना पारनेर – नगर असा भेदभाव मी कधीच करत नाही असे प्रतिपादन आमदार निलेश लंके यांनी केले.
नगर तालुक्यातील निमगाव वाघा, इसळक आणि निंबळक या ठिकाणी रस्ते विकास कामाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पद्मश्री पोपटराव पवार, जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे, गोकुळ जाधव, विजय जाधव, साहेबराव बोडखे, देवा होले, वसंत पवार, अजय लामखडे, आबा सोनवणे, छबुराव कांडेकर, मिठु कुलट,अशोक झरेकर आदी हजर होते.
यावेळी बोलताना आमदार लंके म्हणाले की पारनेर आणि नगर असा भेद मी कधी मानत नाही.संपूर्ण मतदार संघ एकच आहे आणि माझा आहे म्हणून मी त्याकडे पहातो.विकास निधी हा खेचून आणावा लागतो. त्यासाठी आपण नेहमी प्रयत्नशील असतो. राज्यात आपले सरकार आहे त्यामाध्यमातून अनेक विकास कामे आपल्याला मार्गी लावायची आहेत.माझी गाडी म्हणजे जनता बस आहे कोठेही थांबते त्यामुळे यायला उशीर झाला. पण विकास कामे करताना कधी उशीर करत नाही. मतदार संघातील प्रत्येक गावात विकास कामे केले जातील.अजून तर फक्त सुरुवात आहे. राज्यात कोविड कमी होत आहे ही आनंदाची बाब आहे त्यामुळे विकास कामांना वेळ देता येईल आणि निधीही मिळेल.
जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे कधीही भेटले तरी गटातील रस्त्यांची कामे सांगतात. एका कामाच्या उदघाटनाला बोलावतात आणि पुढील 10 रस्त्यांची कामे सांगतात.त्यांच्या गटातील सगळी गावे आणि वाड्या वस्त्या त्यांनी रस्त्यांनी जोडून टाकल्या आहेत.त्यांनी बहुतेक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा क्लास लावलेला दिसतोय.

आमदार निलेश लंके कधीही भेटले तरी राजकारण सोडून विकास कामांसाठी कोठून आणि कसा निधी मिळवता येईल याबाबत चर्चा करतात.मतदार संघातील किंवा मतदार संघ बाहेरील कोणीही काहीही काम सांगू ते नाही म्हणत नाहीत.निवडणूकीनंतर राजकीय हेवेदावे बाजूला ठेवत ते विकास कामांकडे लक्ष देतात.राजकारण पलीकडे जाऊन लोकांचा आणि मतदार संघाचा विचार करणारा माणूस म्हणून पद्मश्री पोपटराव पवार यांनी आमदार लंके यांचे कौतुक केले.