Take a fresh look at your lifestyle.

चर्चा तर होणारच ! ”नव्या बदलाची नांदी…डिजिटल नंदी” !

नंदीबैलावाल्याने लढविली 'अशीही' अनोखी शक्कल !

✒️ सतीश डोंगरे 
शिरूर : जमाना बदलत आहे त्याचबरोबर आता पोटाची खळगी भरण्यासाठी गावोगावी भटकंती करीत फिरणाऱ्या लोककलावंतानीही बदल अंगीकारला आहे. गावोगावी फिरुन नंदीबैलाचे खेळ दाखविणाऱ्या एका नंदीबैलाच्या डोक्यावर चक्क क्यूआर कोड असलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्याची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.

दरम्यान सध्या डिजिटल इंडियाच्या नाऱ्यामुळे प्रत्येकजण डिजिटल झाला आहे. आर्थिक देवाण घेवाणासाठी आपण वेगवेगळ्या डिजिटल साधनांचा वापर करतोय. सोबत पैसे न बाळगता फोन पे, गुगुल पे अशा काही साधनांचा वापर केला जातो. म्हणूनच की काय आता हे लोककलावंतही डिजिटल झाले आहेत. एकेकाळी धनधान्याची मागणी करणारे हे कलावंत आता या स्कॅनकोडचा एक फलकच सोबत घेऊन फिरत आहेत. या स्कॅनकोडचा सर्रास वापर सुरु झाला आहे. अशाच एका कलावंताचा फोटो सध्या सोशल माध्यमावर व्हायरल झाला आहे. यात तो नंदीबैलासोबत दिसत आहे.
बैलाच्या दोन्ही शिंगांमध्ये तो स्कॅनर दिसत आहे. ‘नंदीबैल – डिजिटल कलियुगाचा महिमा’ या नावाने या फोटोने सोशल मिडीयावर धुमाकुळ घातला आहे. आता या कलियुगात लोककलावंतही डिजिटल भाषा शिकत आहेत हे औत्सुकत्याचे ठरले आहे.
एकूणच भटक्या समाजाची आजची स्थिती खूप विदारक आहे. यामध्ये कित्येकांना अद्याप ही रेशनकार्ड,मतदान कार्ड नाही. पर्यायाने शासनाची कोणतीच योजना ह्या समाज घटकातील बहुतांशी लोकापर्यंत पोहचण्याचा प्रश्न येत नाहीय, त्यांना ना हक्काचं गाव ना घर ना शेत ,निव्वळ हातावर पोट असलेल्या माणसाने कोरोना काळात पोटाची खळगी कशी भरली असेल, गेल्या दोन वर्षात, कसा तग धरला असेल ? याचा कधी कुणी विचार केला आहे का ? परंतू एका नंदीबैलाच्या डोक्यावर एक स्कॅनर असलेला फोटो समाजमाध्यमात व्हायरल झाल्यानंतर मात्र त्यावर उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. चर्चेंना उधाण आले आहे.
त्याच्या घरात कोणी शिकलेलं असेल का? त्याचं बँकेत अकाऊंट असेल का? अशा एक ना अनेक प्रश्नांनी नेटकऱ्यांना भंडावून सोडलंय. एखाद्या नंदीबैलवाल्याने वापरलं असेल हे डिजिटल माध्यम तर त्यात वावगं ते काय आहे ? त्यांच्या पिढ्यानपिढ्या तशाच राहिला हव्यात का ? खर तर ज्या अंगाने चर्चा व्हायला हवी होती त्याच्या अगदी उलट घडतांना दिसतयं ..निश्चितच हे चांगले चित्र नाही, अशा प्रतिक्रिया लोककला अभ्यासकांकडून येत आहेत.