Take a fresh look at your lifestyle.

अजित पवारांना ‘यांनी’ दिले थेट आव्हान !

 

सातारा : गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांची डोकेदुखी वाढवली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बेनामी कारखाना जरंडेश्वर हा विकत घेतल्याचा आरोप पत्रकार परिषद घेऊन केला होता. याच पार्श्वभूमीवर जरंडेश्वर कारखाना विक्री घोटाळाप्रकरणी माहिती घेण्यासाठी ते साताऱ्यात दाखल आले होते.
सातारा रेल्वे स्टेशनवर त्यांचे भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले. दरम्यान, यावेळी किरीट सोमय्या म्हणाले की, जरंडेश्वर साखर कारखाना हा शेतकरी सभासदांच्या मालकीचा राहावा, यासाठी प्रयत्न करणार आहे. कारखाना बंद पडण्याची भीती काही लोक दाखवतात, ती चुकीची आहे. हा कारखाना कुणी घेतला याचे उत्तर हिंमत असेल तर अजित पवार यांनी द्यावे, असे आव्हानही किरीट सोमय्या यांनी अजित पवारांना दिले.
सामान्यांना कर्ज मिळवताना त्यांच्या सात पिढ्या जातात. तुम्हाला सात तासांमध्ये 85 कोटींचे कर्ज कसे मिळाले? लवकरच हा घोटाळा बाहेर येणार आहे. मी पाच टप्प्यात माहिती घेण्याचा प्रयत्न केला परंतु अजूनही मला या कारखान्याचा मुळ मालक सापडला नाही. गुरू कमोडिटीचा मालक सध्या तुरुंगात आहे. उच्च न्यायालयाने चौकशीचे आदेश दिले आहेत. त्याची रेषा पवार परिवारांपर्यंत पोहचणार आहे, असेही किरीट सोमय्या म्हणाले.