Take a fresh look at your lifestyle.

स्वतःसाठी वेळ देता येत नाही म्हणून नैराश्य आणि ताण आहे.

सततच्या ताणामुळे वैचारिक पातळी खालावते.

खर्चिक जीवनशैली हा प्रत्येकाचा जगण्याचा भाग झाला आहे. नैसर्गिक जगणं जवळजवळ आम्ही सर्वच विसरलो आहोत.त्यामुळे जास्तीत जास्त अर्थिक कमाई करणे आलेच.सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत विनापैशाचं जगता येत नाही. म्हणजे तशी आम्ही सवयच लावुन घेतली आहे,किंवा नाविलाजाने हे करावं लागतय असही म्हणता येईल. पण यात काही प्रमाणात बदल करुन आत्मिक शांतीकडे जाणे शक्य आहे.
आपली सकाळ कशी होते?
सकाळी कोणती टुथपेस्ट, साबण,शँपु,पावडर,डिओड्रंट,हेर ऑईल,परफ्युम अजुनही असेल बरच काही यातलं किती गरजेचं आहे किंवा ते किती महागडं असावं हा ज्याच्या त्याच्या जीवनशैलीचा भाग आहे. हे सगळं वापरून झालं की मग चहा,नाश्त्यापर्यंत आलो की टि.व्ही.,मोबाईल फोनची मुख्य भूमिका सुरू होते.त्यातही मोबाईल फोन जास्तच महत्वाचा झाला आहे. मग आज सोशल मीडियावर काय आहे?

हे उत्कंठतेने हे पहाणं सुरू होतं.तेच आमचा दिवस कसा जाणार हे ठरवतं.घरबसल्या विनाकारण वादविवादात उडी मारण्यासाठी याहुन सोपे साधन नाही.
साधन सुविधांचा उपयोग ताण वाढवण्यासाठी होत असेल तर फारच वाईट.यामुळे स्वतःसाठी वेळ देणे केवळ अशक्य आहे. जो स्वतःसाठी वेळ देत नाही त्याला मानसिक ताणाला सामोरे जावे लागते.सतत ताण निर्माण करणारे विषय आणि त्यासाठी माध्यम म्हणून निर्माण केलेली व्यवस्था जर वेळीच खंडित करता आली नाही तर वैचारिक तोल हळूहळू जाण्यास सुरुवात होते.एकदा वैचारिक पातळी खालावली की मग आनंदी जगण्याकडचा प्रवास मंदावतो.नकारात्मक विचार वाढत जातात.
मुळातच आयुष्याचा निम्मा भाग झोपण्यात जातो.मग जीवन कितीसं आहे? जागेपणं निम्मच आहे. त्यात काय काय करावं?सुखसुविधांमधे आम्ही अडकत चालल्याने स्वतःसाठीचं सहज जगणं सुकर होत नाही.बरीचशी व्यस्तता आम्ही अकारण वाढवलेली आहे. त्यासाठी एक दिवस मोबाईल फोन बंद करुन ठेवला की लगेच लक्षात येईल. नेटवर्क गेले की मग काय होते हे आपण अनुभवतो.यात आम्ही स्वतःसाठी काय करत असतो?जगात काय चाललय हे जास्त महत्वाचं वाटतं ना?
आत्मचिंतन हा आनंदी जगण्याचा पाया आहे. जगाच्या चिंतनाने केवळ ताणतणावात भर पडेल.घडामोडी कळाव्यात इतकच त्याचं महत्त्व आहे. तुकोबाराय म्हणतात,
देव होईजेत देवाचे संगती।पतन पंगती जगाचिया।।
पतन करणारी सर्व व्यवस्था आमच्या जवळ सज्ज आहे.देव संगती करणही शक्य आहे. आपण स्विकारतो काय यावर आपलं जग कसं असेल हे ठरणार आहे.
रामकृष्णहरी