Take a fresh look at your lifestyle.

घरात ‘एवढेच’ तोळे सोनं ठेवता येते !

जाणून घ्या,नाहीतर बसेल मोठा फटका !

नवी दिल्ली : भारतीयांना सोन्याविषयी असणारे आकर्षण ही काही नवी बाब नाही. विविध कारणांसाठी आणि विविध निमित्ताने भारतीय नागरिक सोन्याचे दागिने विकत घेत असतात. काही लोक सोन्याची खरेदी वैयक्तिक वापरासाठी म्हणजे दागिन्यांच्या रूपात करतात. काही जण सोन्याची खरेदी गुंतवणुकीसाठी करतात. वेळप्रसंगी उद्योग-धंद्यात पटकन सोने तारण कर्ज मिळावे किंवा भांडवल उभारता यावे म्हणूनदेखील काही जण सोनं विकत घेतात; मात्र आपण घरामध्ये किती सोनं ठेवू शकतो याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? आयकर विभागाने याबाबत मर्यादा घालून दिली आहे.
घरामध्ये किती सोनं किंवा दागिने ठेवता येते, याची एक मर्यादा आयकर विभागाने ठरवली आहे. घरामध्ये ठेवलेलं सोनं आयकर विभागाकडून जप्त केलं जाऊ नये, असं वाटत असेल तर यासंबंधी असणारा नियम जाणून घेणं गरजेचं आहे. तसंच कोणत्या परिस्थितीत आयकर विभाग तुमच्या घरातलं सोनं जप्त करू शकतो, याचीही नियमावली माहिती असणे गरजेचे आहे. ‘टीव्ही नाइन हिंदी’ने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

केंद्रीय अर्थ मंत्रालयाने याबाबतचे नियम तयार केले आहेत. एखाद्या व्यक्तीला वारसहक्काने मिळालेले सोने किती प्रमाणात घरामध्ये ठेवता येतं, उत्पन्नाचा स्रोत नसताना घरामध्ये किती सोने ठेवता येते, असे वेगवेगळे नियम त्यात आहेत.
आयकराच्या नियमांनुसार, विवाहित महिलेच्या नावावर घरात 500 ग्रॅमपर्यंत सोनं ठेवता येतं. स्त्री अविवाहित असेल तर हे प्रमाण 250 ग्रॅम पर्यंत आहे. पुरुषांच्या बाबतीत असा कोणताही नियम घालण्यात आलेला नाही. कुटुंबातल्या कोणत्याही पुरुष सदस्याच्या नावावर 100 ग्रॅमपर्यंत सोनं ठेवता येते. कोणत्याही उत्पन्नाच्या स्रोताशिवाय अधिक सोनं सापडल्यास कारवाई केली जाऊ शकते.
तुम्हाला भेट म्हणून किंवा वारसाहक्कात सोनं मिळाले असेल, तर त्याची कागदपत्रं दाखवावी लागतात. आयकर विवरणपत्रातही याचा उल्लेख करावा लागतो. ज्या व्यक्तीने तुम्हाला सोनं भेट दिले, त्या व्यक्तीकडून मिळालेली पावती कागदपत्र म्हणून तुम्ही दाखवू शकता. कौटुंबिक सेटलमेंट डीड, गिफ्ट डीडदेखील दाखवू शकता, ज्यामध्ये सोन्याचे हस्तांतरण केल्याबाबत माहिती असेल. तुमच्याकडे कोणताही पुरावा नसेल, तर छापे घालणारा मूल्यांकन अधिकारी तुमच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती, रीतिरिवाज आणि धार्मिक परंपरा लक्षात घेऊन कारवाई करायची की नाही हे ठरवू शकतो.
एखाद्या व्यक्तीकडे उत्पन्नाचा योग्य स्रोत असेल किंवा त्याला वारसहक्काने सोनं मिळालं असेल तर या दोन्ही प्रकरणांमध्ये सोनं घरामध्ये ठेवण्यासाठी कोणतीही मर्यादा नाही. अशा स्थिती घरात पाहिजे तितके सोने ठेवता येते. आयकर विभाग यासंदर्भात कोणतेही प्रश्न विचारत नाही. कारण आयकर विभागाने चौकशी केली, तरीही अशा स्थितीत स्रोत सांगता येणे शक्य असतं. योग्य स्रोत असल्यास तुमच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही.
उत्पन्नाचा कोणताही स्रोत नसेल किंवा मिळणारं उत्पन्न हे घरामध्ये असणाऱ्या सोन्याच्या प्रमाणाशी जुळत नसलं तर काय होईल? एक तर तुमची कमाई कमी आहे आणि त्या तुलनेत घरात जास्त सोनं आहे किंवा तुम्ही अजिबात पैसे कमावत नाही आणि घरात सोनं ठेवलेलं असेल तर आयकर विभागाकडून कारवाई होऊ शकते; मात्र हे सोनं घरातल्या विवाहित महिलेचे असल्याचं सांगितल्यास सवलत मिळू शकते.
हे सर्व नियम असूनही, घरात ठेवलेल्या सोन्याबाबत काय कारवाई करायची, हे मूल्यमापन अधिकाऱ्यावर अवलंबून आहे. त्या अधिकाऱ्याला असं जाणवलं, की कुटुंबाचे रीतिरिवाज किंवा धार्मिक श्रद्धेनुसार सोनं उत्पन्नाच्या स्रोतापेक्षा जास्त ठेवलं आहे, तर तो कोणतीही कारवाई करणार नाही. आयकर विभागाची सूट तेव्हाच मिळू शकते, जेव्हा घरात ठेवलेले सोन्याचे दागिने कुटुंबातल्या सदस्यांच्या नावावर असतातत. तुमच्या घरात इतर कोणाचे सोने किंवा दागिने ठेवले असतील तर ते जप्त केले जाऊ शकतात.
गेल्या काही वर्षांमध्ये सोन्याचे दर वाढल्याने आणखीच महत्त्व प्राप्त झालं आहे. अजूनही लोक मोठ्या प्रमाणावर सोनं खरेदी करताना दिसतात; मात्र सरकारने सोने खरेदी, गुंतवणूक आणि त्याच्या साठवणुकीबाबत लागू केलेल्या नियमांचं पालन न केल्यास कारवाईला सामोरे जावे लागू शकते.