Take a fresh look at your lifestyle.

ग्रेटच ! नगरमधील ‘या’ गावात झाले शंभर टक्के लसीकरण !

आता आरोग्य क्षेत्रातही उमटवला वेगळा ठसा.

नगर : आदर्श गाव हिवरे बाजारने जलसंवर्धन, पाणलोट, स्वच्छता, वृक्षसंवर्धन, शिक्षण या क्षेत्राबरोबरच आरोग्य क्षेत्रातही राज्यात वेगळा ठसा उमटवला आहे. गावचे उपसरपंच, पद्मश्री यांनी स्वतः घरोघरी जावून कोरोना प्रतिबंधक लसीचे शंभर टक्के लसीकरण करुन घेतले आहे.
आदर्श गाव हिवरे बाजार येथे पाच ऑक्टोबर २०२१ ला लसीकरणाचा नववा टप्पा पूर्ण करून मंगळवारी हिवरे बाजार गावाचे कोविड १९ लसीकरण शंभर टक्के पूर्ण झाले. मतदार यादीनुसार हिवरे बाजारमधील वय वर्षे १८ च्या पुढील एकूण ८९७ व्यक्ती लसीकरणासाठी पात्र होत्या. संपूर्ण व्यक्तीचे लसीकरण करण्यात आले.पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आदर्श गाव हिवरे बाजार येथे शंभर टक्के लसीकरण काल (मंगळवारी) यशस्वीपणे पार पडले.
या वेळी उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी हिवरे बाजार येथील लसीकरण केंद्राला भेट देऊन ग्रामस्थांशी समक्ष चर्चा केली. जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी कोविड -१९ लसीकरणाबाबत मार्गदर्शन केले तसेच, तहसीलदार उमेश पाटील यांनी एकत्रित लसीकरण कामकाजाचा आढावा घेतला. ज्या व्यक्ती अपंग किंवा जास्त वय झालेले असेल, अशा व्यक्ती लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर येऊ शकत नाही, अशा व्यक्तीच्या घरी जाऊन लसीकरण करण्यात आले.
लसीकरणासाठी विशेष सहकार्य व समन्वयाची भूमिका हिवरे बाजार प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या डॉ. शिवानी देशपांडे व त्यांचे सर्व सहकारी तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र टाकळी खातगावच्या डॉ. दुर्गा बेरड, कामगार तलाठी संतोष पाखरे, सरपंच विमल ठाणगे व ग्रामपंचायत सदस्य यांचे सहकार्य लाभले.