Take a fresh look at your lifestyle.

लौकिक आणि अलौकिक जीवनात चिंता अपरिहार्य !

पण लौकिकाचा त्याग केल्यास चिंतामुक्त जगणं शक्य आहे.

 

चिंता नाही तो मनुष्यच नाही असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.सन्यस्त जीवनापेक्षा प्रापंचिकाला चिंता जास्तच असतात,पण सन्यस्त जीवनातही चिंतामुक्त रहाणं कठीण आहे. एक संन्याशी अत्यंत आनंदाने आपलं जीवन व्यतित करत होता.नदीवर जावं स्नान करावं,ध्यानधारणा करावी,ग्रंथचिंतन करावं,पोटाच्या गरजेपुरती भिक्षा मागावी.तो सतत अत्यंत प्रसन्न असायचा.
कसला कर्जाचा इएमाय नाही की बँक बॅलन्स ठेवण्याची चिंता नाही.काही मिळवण्याचा मोह त्याला नव्हताच.अलौकीक ज्ञानाने तो समृद्ध होता.काहीही सोबत नेता येत नाही याची त्याला पुरेपूर खात्री होती. अगदी मजेत चाललं होतं.एकदा तो भिक्षा मागण्यासाठी एका बंगल्याच्या दरवाजात गेला.शेठजी मोठे दयाळु,दानशूर होते.त्यांनी या संन्याशाला एक गाय दान केली.आता संन्याशाचा दिनक्रम बदलला.त्याला गाय चारण्यासाठी वेळ द्यावा लागे.वेळेवर दुध काढावे लागे,पुढे ती व्याली.मग तिच्या चाऱ्यासाठी चार घरं अजून मागावी लागतं.दुध जास्त मिळत असल्याने ते विकुन चार पैसे मिळु लागले.मग त्याने झोपडीचे रुपांतर सिमेंट कॉन्क्रिटच्या घरात केले.

मग असाच एक दयाळु माणुस पुन्हा भेटला.त्याने त्याच्यासाठी एक कन्या पाहुन त्याचा विवाह केला.त्यानंतर मात्र तो कधीच चिंतामुक्त दिसला नाही.ध्यानधारणा तर तो पुर्ण विसरुनच गेला.प्रपंचात पुरता गुरफटला.बायको मुलांच्या जबाबदारीने तो पुरता गांजला.मग त्याने पुन्हा सन्यासी होण्याचा निर्णय घेतला.आता त्याच्याकडे अनेक गायी होत्या.पण त्याने आता एकही गाय सोबत घेण्याचा विचार केला नाही.लौकिकाचा त्यान त्याग केला.अलौकिक भान पुन्हा निर्माण झालं.

सज्जनहो गोष्ट संपली.त्यानं सन्यास घेण्याचं धाडस केलं कारण मुळात तो सन्यस्त होताच.मधे थोडं मळभ तयार झालं.मोहमाया आडवी आली आणि पुढच्या व्यवस्थेने त्याला चिंतातुर केले.त्याने पुन्हा सन्यास घेतला पण हे आपल्याला जमणार नाही. तसं करुही नये.प्रपंचातील ऊब आम्हाला तसं करु देतच नाही.प्रपंच म्हणजेच लौकिक मिळवणे आहे.
प्रपंच म्हणजे विषयसुख.शरीराचे लाड करणारी व्यवस्था. बसल्या जागेवर बायकोने चहा आणुन द्यावा,आवडीचे पदार्थ करावेत.हे सुखच जखडुन ठेवायला पुरेसे आहे पण स्वावलंबनाची हत्या करणारं आहे.घरी कुणी नसेल तर स्वतःच्या हाताने चहा करण्याचं सामर्थही शिल्लक रहात नाही.पण हे मिळवण्यासाठी काय काय केले आहे आहे आणि अजुनही काय काय करावे लागणार आहे? याची कल्पना ज्याला त्याला आहेच.

तुकोबाराय म्हणतात, विषयाचे सुख घेता हरघडी चिंता.चिंता आमची पाठ सोडणार नाही. सन्यास घेऊनही चिंतामुक्त जगता येण्याची खात्री नाही. घर जुने झाले म्हणून आम्ही ते लगेच पाडीत नाही. डागडुजी,रंगरंगोटी करत रहातो.आम्ही चिंतामुक्त जगण्यासाठीआयुष्याला,डागडुजी, रंगरंगोटी करण्याचा फारसा प्रयत्न करत नाही.कारण लौकीकातच समाधान शोधण्याचा महामुर्खपणा आम्ही सारेच करत आलो आहोत.अलौकिक ज्ञान आम्हाला चिंतामुक्त जीवन देण्यास समर्थ आहे. परोक्ष आणि अपरोक्ष ज्ञानाने चिंतामुक्ति शक्य आहे. प्रपंचात राहुन हे शक्य आहे. कसं ते उद्याच्या भागात पाहु.रामकृष्णहरी