Take a fresh look at your lifestyle.

आर्थिक गैरव्यवहार दडपण्यासाठी दूध संघाचे संचालक राष्ट्रवादीमध्ये !

'त्यांना' राष्ट्रवादीचे नेतेमंडळीच पाठीशी घालत असल्याचा आरोप.

 

नगर : तालुका दूध संघाच्या संचालक मंडळावर 8 कोटी 30 लाखांच्या आर्थिक अनियमिततेबाबत गुन्हे दाखल झाले आहेत. तो गैरव्यवहार दडपण्यासाठी हे संचालक माजी आमदार शिवाजीराव कर्डीले यांना सोडून राष्ट्रवादीमध्ये दाखल झाले आहेत. भ्रष्टाचारी संचालकांची राष्ट्रवादीकडून पाठराखण सुरू असल्याचा आरोप दूध संघाच्या कर्मचारी संघटनेचे तायगा शिंदे आणि गजानन खरपुडे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केला.
यावेळी बोलताना तायगा शिंदे म्हणाले की नगर तालुका दूध संघ हा गैरव्यवहाराचा अड्डाच बनला आहे.2005 ते 07 या कालावधीत तत्कालीन संचालक मंडळावर 2 कोटींचा अपहार केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. जिल्हा संघाच्या मालकीची जागा विकून नगर तालुक्याच्या वाट्याला 8 कोटी रुपये आले होते.पण आर्थिक ताळेबंदात अनेक घोटाळे घातल्याचे चौकशी समितीच्या निदर्शनास आल्या नंतर चौकशी अधिकारी एन डी गोधेकर यांनी मार्च 2021 मध्ये विद्यमान संचालक मंडळाविरोधात 8 कोटी 30 लाखांच्या आर्थिक गैरव्यवहार बाबत गुन्हे दाखल केलेले आहेत. पण राजकीय पाठबळामूळे अद्यापही त्या संचालकाना अटक झालेली नाही.

विद्यमान संचालक मंडळ यांनी एमआयडीसी इमारत दुरुस्तीच्या नावाखाली 25 ते 30 लाखांचा , मशीनरी दुरुस्तीच्या नावाखाली 5 लाखांच्या गैरव्यवहार केलेला आहे. तसेच संचालक मंडळातील किसन बेरड, कैलास मते, वैशाली मते, मोहन तवले, राजाराम धामणे, पुष्पा कोठुळे, भाऊसाहेब काळे, बजरंग पडळकर यांनी ऍडव्हान्सच्या नावाखाली 23 लाख रुपये घेऊन अपहार केल्याचेही चौकशी अहवालात स्पष्ट झाले आहे.यासह अनेक घोटाळे झालेले आहेत.
त्यामुळे नगर तालुका दूध संघ हा गैरव्यवहार करण्याचा अड्डाच बनला आहे.विद्यमान संचालक मंडळावर आर्थिक गैरव्यवहार बाबत दाखल झालेले गुन्हे दडपण्यासाठीच 9 संचालकांनी माजी आमदार कर्डिले यांना सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला आहे.पण सकृतदर्शनी ते राष्ट्रवादीमधे गेल्याचे दिसत असले तरी अंतर्गत हे सगळे कर्डिले यांच्या मर्जीतच आहेत.तालुका दूध संघात आर्थिक घोटाळे होत असताना तालुका दूध संघाचे 273 कर्मचाऱ्यांना मात्र त्यांच्या हक्कांचे पैसे मिळालेले नाहीत.न्यायालयाने वेळोवेळी देणी देण्याबाबत सूचना केल्या असतानाही संचालक मंडळाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे.
नगर तालुका दूध संघाकडे अवघे दीड हजार लिटरचे दूध संकलन आहे.ते दूध शीतकरण करण्यासाठी जेवढी वीज लागते त्याच्या कितीतरी पट अधिक वीज बिल तालुका दूध संघ आजमितीला भरत आहे.त्या ठिकाणी खाजगी दूध संघाचे 450 ते 500 टँकर दूध शीतकरण करून त्यापोटी 35 लाख रुपये अवैध गोळा करत वीज बिलाचा भुर्दंड तालुका संघाच्या माथी मारला आहे.त्यावर चौकशी सुरू असून राजकीय दबावातून तो अहवाल दडपला जात आहे.