Take a fresh look at your lifestyle.

ब्रेकिंग : पारनेरातील ‘ या’ चार गावांमध्ये पुन्हा लॉकडाऊन !

ग्रामस्थ व व्यापारी लॉकडाऊनच्या विरोधात आक्रमक.

पारनेर : अहमदनगर जिल्ह्यांतल्या ज्या गावांमध्ये दहापेक्षा अधिक कोरोना बाधित रुग्ण आहेत, अशी गावे आठवडाभरासाठी अत्यावश्यक सेवा वगळून प्रतिबंधित करण्याचे आदेश नगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिल्यानुसार पारनेर तालुक्यातील सहा गावे सोमवारपासून लॉकडाऊन झाल्यानंतर तालुक्यातील आणखी चार गावे आजपासून बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यामुळे बंद ठेवण्यात आलेल्या गावांची संख्या दहा झाली आहे.
ज्या गावांत कोरोनाचे दहापेक्षा अधिक रुग्ण सक्रीय आहेत, अशा गावांत पुन्हा लॉकडाऊन करण्यात यावे, असे जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्या या आदेशात म्हटले आहे.

पारनेर तालुक्यातील भाळवणी, कान्हूर पठार,गोरेगाव,जामगाव, दैठणे गुंजाळ, वडनेर बुद्रुक ही सहा काल (सोमवार) पासून बंद करण्यात आल्यानंतर आज पासून निघोज, वाडेगव्हाण, टाकळी ढोकेश्वर व अळकुटी ही मोठया बाजारपेठेची चार गावे पुन्हा लॉकडाऊन करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी निर्गमित केले आहेत.
अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची आकडेवारी दररोज वाढते आहे. प्रतिदिन पाचशे ते आठशे कोरोनाचे रुग्ण जिल्ह्यात आढळून येत आहेत. कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांचे प्रमाण पाच टक्के असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी आज निर्गमित केलेल्या पत्रात म्हटले आहे.
प्रतिबंधित करण्यात या गावांमधील किराणा आदी अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने सकाळी आठ ते अकरा वाजेपर्यंत ठेवावीत. दुकानदारांनी कोव्हॅक्सिन,कोविशिल्ड अशा लसी घेतल्या आहेत का ?याविषयीची माहिती जिल्हा प्रशासनाला कळवावी, दुकानात काम करणाऱ्या सर्वांसह ग्राहकांनी सॅनिटायझर, मास्क आदींचा कटाक्षानं वापर करावा. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करावे. दरम्यान, ज्या अत्यावश्यक दुकानांमध्ये नियमांचे पालन होत नाही, अशी दुकाने ३० दिवसांसाठी तहसिलदारांच्या आदेशानुसार बंद करण्यात यावीत, असे जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी निगर्मित केलेल्या आदेशात म्हटले आहे.
दरम्यान,तालुक्यातील गावे पुन्हा लॉकडाऊन होत असल्याने व्यापारी वर्ग संतप्त झाला आहे. गेली दोन वर्षापासून सतत लॉकडाऊनचा खेळ सुरू असल्याने आमच्यावर उपासमारीची वेळ आल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. लॉकडाऊनच्या विरोधात काल कान्हूर पठार येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले तर भाळवणी येथेही ग्रामस्थ, व्यापारी आक्रमक झाले होते. प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांनी मध्यस्थी करीत अहवाल सादर करून शुक्रवारपर्यंत निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.