Take a fresh look at your lifestyle.

‘घोटभर दारू, वाटीभर रस्सा आणि पाच वर्ष बोंबलत बसा !’

सदाभाऊ खोतांचा महाविकास आघाडीला टोला.

नांदेड : शिवसेनेतून भाजपात प्रवेश केलेल्या माजी आमदार सुभाष साबणे यांना भाजपाने देगलूर बिलोली जागेसाठी उमेदवारी जाहीर केली आहे. काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापुरकर यांच्या निधनानंतर या देगलूर बिलोली मतदारसंघात पोट निवडणूक होणार आहे. याच पार्श्वभूमीवर सुभाष साबणे यांना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थित प्रवेश देण्यात आला आहे. तसेच माजी मंत्री सदाभाऊ खोत देखील यावेळी उपस्थित होते.
यावेळी सदाभाऊ खोत यांनी कार्यक्रमात बोलताना महाविकास आघाडी सरकार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाणांवर निशाणा साधलाय. महाविकास आघाडी सरकारमध्ये ज्यांच्याकडे बांधकाम खातं आहे त्यांच्याच जिल्ह्यात खड्डे आहेत. डांबर खाल्लं, मुरुम खाल्ला, असा घणाघात खोत यांनी चव्हाणांवर केलाय.
तसेच पुढे शेतकऱ्यांना मदत द्या मग मतदान मागा. घोटभर दारू, वाटीभर रस्सा आणि पाच वर्षे बोंबलत बसा असं होऊ देऊ नका, असा सल्लाही खोत यांनी मतदारांना दिला आहे. तर अशोक चव्हाण हा भाग्यवान माणूस, पण सरपंचाचा शिपाई झाला. मुख्यमंत्री होते पण लाचार होऊन मंत्रिमंडळात मंत्री झाले, असा टोला देखील खोत यांनी चव्हाणांना लगावलाय.