Take a fresh look at your lifestyle.

तुडूंब भरली ‘सीनामाई’…आनंदाला पारावरच उरला नाही !

ग्रामस्थांनी केले सीना नदीचे जलपूजन

अहमदनगर: वडगाव गुप्ता येथील सीना नदी रुंदीकरण, खोलीकरण झाल्यामुळे तसेच उगम क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने तुडुंब भरून वाहत आहे.यामुळे ग्रामस्थांच्या आनंदाला उधाणं आले होते. त्यामुळे नवनागापूरचे सरपंच डॉ.बबनराव डोंगरे यांच्या हस्ते सीना नदी पात्रात जलपूजन करण्यात आले.
यावेळी वडगाव गुप्ताचे सरपंच विजय शेवाळे, उपसरपंच बाबासाहेब गव्हाणे, ग्रामविकास अधिकारी ज्ञानेश्वर अडसुरे, माजी उपसरपंच गणेश डोंगरे, शिवाजी घाडगे, बबन कोऱ्हाळे, ग्रामपंचायत सदस्य उमेश डोंगरे, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा सरचिटणीस हुसेन सय्यद, लक्ष्मण गव्हाणे, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष नारायण शिंदे, राष्ट्रवादी सांस्कृतिक सेलचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब डोंगरे सुखदेव ढेपे, सावित्राम गुडगळ, आरोग्य अधिकारी सौ कांबळे, कृषी सहाय्यक सौ गिरी, अंगणवाडी पर्यवेक्षिका सौ शिंदे, तसेच अंगणवाडी पर्यवेक्षिका ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना सरपंच विजय शेवाळे म्हणाले की स्मशानभूमी लगत बंधारा बांधण्यात आल्यामुळे त्याचा गावाला चांगलाच फायदा झाला आहे. या बंधाऱ्याचे काम कुठलाही शासकीय निधी न घेता लोकसहभागातून करण्यात आले आहे. भविष्यात गावात शंभर टक्के हागणदारीमुक्ती सोबत गवत कचरा व्यवस्थपन आणखी प्रभावी करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. विकासासाठी भविष्यात विविध योजना राबवण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. वडगाव गुप्ता ग्रामपंचायतीला क्रियाशील ग्राम विकास अधिकारी लाभल्याने त्यांच्या अनुभवाचा फायदा गावच्या विकासासाठी होत असल्याचेही ते म्हणाले.
यावेळी प्राचार्य शिवाजीराव घाडगे, ग्रामपंचायत सदस्य उमेश डोंगरे, राष्ट्रवादी सांस्कृतिक सेलचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब डोंगरे राष्ट्रवादी सांस्कृतिक सेलचे जिल्हा सरचिटणीस रियाज पठाण यांनी मनोगत व्यक्त केले.
चांगले काम करण्याची इच्छा शक्ती असेल, तर काहीही अशक्य नाही, हे नगर तालुक्यातील वडगावगुप्ता गावाच्या सरपंच व ग्रामस्थांनी दाखवून दिले आहे. शहराला खेटून असलेल्या आणि शेतीच्या पाण्याचा कोणताच शाश्वत पर्याय नसणाऱ्या गावाने ठरविले आणि गावा शेजारी असणाऱ्या सीना नदीचे साडेतीन किलो मीटर खोलीकरण केले. यामुळे नदी गेल्या दोन वर्षापासून तुडुंब भरून वाहत आहे. यामुळे गावातील बहुतांशी शेतीचा प्रश्न मार्गी लागला आहे. याचसोबत काळाची गरज ओळखून या गावाने गावातील प्रत्येक घरापुढे उंच वृक्षाचे रोपण केले आहे.
सरपंच व ग्रामस्थांनी राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून गावाचा विकास करण्याचा ध्यास घेतला कोणत्याही गावाच्या विकासाला आवश्यक असते ते शेतीसाठी पाणी, गावातील रस्ते, वाड्या वस्त्यांना जोडणारे रस्ते. ही गरज ओळखून सरपंच शेवाळे आणि त्यांच्या टीमने गावच्या परिसरात असणाऱ्या वाड्या वस्त्यांना जोडण्यासाठी १५ किलो मीटर रस्त्याचे जाळे तयार केले.
याचसोबत स्वयंसेवी संस्थाच्या मदतीने भारत फोर्ज या कंपनीच्या माध्यमातून गावाजवळून वाहणाऱ्या सीना नदीचे साडेतीन किलो मीटरपर्यंत खोलीकरण केले. त्यातच यंदा चांगला पाऊस झाल्याने उन्हाळ्यात देखील या पाण्याचा उपयोग ग्रामस्थांना होणार आहे.
 गावामध्ये लोकसहभागातून जास्त उंचीच्या २ हजार ३०० वृक्षाची लागवड केलेली आहे. भविष्यात या वृक्ष लागवडीचा सकारात्मक परिणामगावातील जनतेला होणार आहे.