Take a fresh look at your lifestyle.

प्रत्येक बुद्धिवान मनुष्य ज्ञानी असेलच असं नाही !

त्याच्या ठायी असलेलं अज्ञान हेच त्याचं कारण आहे.

जगण्यासाठी किती धन कमवावं याचं गणित कुणाला शिकावं वाटत नाही. बहुतांश माणसं दैनंदिन जीवन जगण्यासाठी लागणारं धन मिळवण्यासाठी हयातभर कष्ट करतात.नोकरी करणारे सरतेशेवटी दोन पैसे शिल्लक ठेऊ शकतात.व्यावसायिक त्याच्या कौशल्याने चार पैसे जास्त कमावु शकतो.थोडक्यात सांगायचे म्हणजे पैसा कमावणं यालाच जीवनात महस्थान आहे.आणि असलाच पाहिजे. पण तो आयुष्यभराच्या प्रपंचासाठी किती कमवावा याचा हिशोब करणं कठीण असलं तरी विद्वान मनुष्य त्याच्या सीमा ठरवु शकतो.त्यासाठी गर्भश्रीमंत किंवा अरब,खरबपती असलं पाहिजे असं काही नाही.
जेवढा हव्यास तेवढी भुक मोठी.भुक वाढण्यातही गैर काही नाही, पण तृप्तीचा ढेकर देता आला पाहिजे. तो तृप्तीचा ढेकर कसा देता येतो हे अनेकदा उमजत नाही. मग धनाढ्य होऊन समाजात उच्छाद मांडणारी अनेक मंडळी आपल्याला दिसतात,आपल्या श्रीमंतीचं प्रदर्शन करताना दिसतात, गोरगरिबांना लुबाडुन अधिक धनाढ्य होण्याचा सतत प्रयत्न करणारी मंडळी दिसतात.

या उलट अनेक धनवान माणसं अशीही दिसतात की ऐश्वर्यसंपन्न असुनही कधी त्याचा तोरा दिसत नाही. कायम सामान्य स्थितीत रहातात,समाजासाठी योगदान देण्यासाठी सदैव तत्पर असतात.त्यांच्या अस्तित्वाची अनेकांना सावली असते.गोरगरिबांचं जीवन त्यांच्यामुळे सुकर होतं. हा विरोधाभास का पहायला मिळतो?
अध्यात्मात याचं उत्तर मिळतं.माया आणि ब्रम्ह हे दोन घटक हे सर्व प्राणीमात्रांना चेतन ठेवून कर्म करण्याची वृत्ती बहाल करतात.कृती करण्याची इच्छा अहंकार निर्माण करतो.अहंकाराचं प्रभुत्व प्रत्येक जीवाच्या ठायी जीव आहे तोपर्यंत रहाते.हिंस्र श्वापदं कधी गवत खात नाहीत,गवत खाणारे प्राणी कधी मांसाहार करीत नाहीत.वनस्पती आपला गुणधर्म सोडत नाहीत.चिंच आंबटच लागते आणि केळी,आंबा गोडच लागतो.यामागचा मुख्य सुत्रधार अहंकार आहे. म्हणजेच अहंकाराशिवाय हे जग चालुच शकत नाही हे निश्चित आहे.
मनुष्य मात्र त्याला अपवाद आहे.अहंकाराचा असमतोल मनुष्यात पहायला मिळतो.कारण त्याला मिळालेलं बुद्धीचं वरदान.त्यामुळे लाभलेली विचार करण्याची शक्ती त्यायोगे स्वार्थीपणाची जोपासना वाढली की मग अहंकारच कृतीचा मालक बनतो.मन,बुद्धी आणि चित्त हे अहंकाराचे सोबती आहेत. पण याचा समतोल जो राखु शकेल तो देवगुणी मनुष्य होतो.माया ही फसवी आहे याचा बोध नियंत्रित अहंकाराने होतो.आपण निर्भेळ आनंद मिळवण्यासाठी ज्या अपेक्षा ठेवतो त्या इतरांच्याही असतील याचं भान मनुष्याला ब्रम्हर्षी करतो.माया ब्रम्हाचं संतुलन ध्यानधारणेनं शक्य आहे. हव्यास नियंत्रण होण्याची ती गुरुकिल्ली आहे. नामचिंतन हे अत्यंत सोपं साधन आहे. आपण सतत त्या प्रयत्नात असलं पाहिजे.
रामकृष्णहरी