Take a fresh look at your lifestyle.

पारनेरातील ‘ही’ सहा गावे पुन्हा लॉकडाऊन !

जिल्हाधिकारी डॉ.भोसले यांनी दिले आदेश.

पारनेर : अहमदनगर जिल्ह्यांतल्या ज्या गावांमध्ये दहापेक्षा अधिक कोरोना बाधित रुग्ण आहेत, अशी गावे आठवडाभरासाठी अत्यावश्यक सेवा वगळून प्रतिबंधित करण्याचे आदेश नगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत. यानुसार पारनेर तालुक्यातील सहा गावे पुन्हा लॉकडाऊन झाली आहेत.
नगर जिल्ह्यातील पारनेर, अकोले, कर्जत, कोपरगाव, नेवासे, पाथर्डी, राहता, संगमनेर, शेवगाव, श्रीगोंदा, श्रीरामपूर या अकरा तालुक्यांमध्ये ज्या गावांत कोरोनाचे दहापेक्षा अधिक रुग्ण सक्रीय आहेत, अशा गावांत पुन्हा लॉकडाऊन करण्यात यावं, असं जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्या या आदेशात म्हटले आहे.
पारनेर तालुक्यातील भाळवणी, कान्हूर पठार,गोरेगाव,जामगाव, दैठणे गुंजाळ, वडनेर बुद्रुक ही सहा गावे तर अकोले तालुक्यातील तीन, कर्जतची दोन, नेवासा, कोपरगाव तालुक्यातील प्रत्येकी एक गाव, पाथर्डी एक, राहाता सात, संगमनेर चोवीस, शेवगाव चार, श्रीरामपूर तीन अशा नगर जिल्ह्यातल्या तब्बल ६१ गावांमध्ये कोरोनाचे १० पेक्षा जास्त रुग्ण सक्रिय आहेत. अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची आकडेवारी दररोज वाढते आहे. प्रतिदिन पाचशे ते आठशे कोरोनाचे रुग्ण जिल्ह्यात आढळून येत आहेत. कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांचं प्रमाण पाच टक्के असल्याचं जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी आज निर्गमित केलेल्या पत्रात म्हटले आहे.
प्रतिबंधित करण्यात या गावांमधील किराणा आदी अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने सकाळी आठ ते अकरा वाजेपर्यंत ठेवावीत. दुकानदारांनी कोव्हॅक्सिन,कोविशिल्ड अशा लसी घेतल्या आहेत का ?याविषयीची माहिती जिल्हा प्रशासनाला कळवावी, दुकानात काम करणाऱ्या सर्वांसह ग्राहकांनी सॅनिटायझर, मास्क आदींचा कटाक्षानं वापर करावा. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करावे. दरम्यान, ज्या अत्यावश्यक दुकानांमध्ये नियमांचे पालन होत नाही, अशी दुकाने ३० दिवसांसाठी तहसिलदारांच्या आदेशानुसार बंद करण्यात यावीत, असे जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी निगर्मित केलेल्या आदेशात म्हटले आहे.