Take a fresh look at your lifestyle.

गोरेगावच्या मातीत सोनं उगवतं !

सरपंच सुमन तांबे यांचे गौरोद्गार 

पारनेर : गोरेगावच्या मातीत सोनं उगवतं, इथं एकाहून एक रत्न आहेत.असे गौरवोद्गार सरपंच सुमन तांबे यांनी काढले.समर्थ बेहडे याची नवोदयसाठी निवड झाल्याबद्दल सत्कार समारंभ कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
या कार्यक्रमास डॉ.बबन तांबे,डॉ.मनीषा तांबे,मुख्याध्यापक पोपट कदम,अनिता खरमाळे,संतोष नरसाळे, संदीप नरसाळे मेजर,गणेश चौरे,गणेश तांबे,समर्थचे पालक बाळासाहेब बेहडे व नम्रता बेहडे हे उपस्थित होते.
मॉडेल व्हीलेज गोरेगाव येथील ढवळदरा जिल्हा परिषद वस्ती शाळेतील कु.समर्थ बाळासाहेब बेहडे याची नवोदयसाठी निवड झाली.22,000 विद्यार्थी या परीक्षेसाठी बसले होते, त्यातून 80 मुलांची निवड करण्यात आली.या परीक्षेत समर्थ 96.25 गुण मिळवून जिल्ह्यात तिसरा आला.सर्वत्र ऑनलाईन शिक्षण व्यवस्थेचा बोजवारा उडालेला असताना,ग्रामीण भागामध्ये ऑनलाईन शिक्षणाचा परिणाम स्वागतार्ह आहे.श्री.कदम व श्रीमती खरमाळे या दाम्पत्याने शाळा एका कुटुंबाप्रमाणे उभी केली आहे.
डोंगरात असणारी प्रसन्न आणि टुमदार शाळा बाबासाहेब तांबे व सौ.सुमन तांबे या दाम्पत्याच्या माध्यमातून अधिकच सुबक आणि आकर्षक तयार झाली.त्यामध्ये संरक्षक भिंत,पेविंग ब्लॉक युक्त परिसर,पिण्याच्या पाण्याची व्यवस्था,सुलभ शौचालय,हरित परिसर,डिजिटल वर्ग,रंगकाम,यामुळे शाळा अधिकच सुंदर बनली आहे.कुठलेही वर्ग घेण्याची सक्ती नसताना या कदम दाम्पत्याने आपले कुटुंब म्हणून शाळेला न्याय दिला.वर्षभर दुपारी 12 ते 5 त्यांनी गुगल मीट वर 10 विद्यार्थ्यांचा नवोदयसाठी अभ्यास घेतला,तयारी करून घेतली.अगदी एक गुणावरून तीन विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकला नाही,पण त्यांच्या आशा पल्लवित आहेत.प्रतीक्षा यादीत असणाऱ्या 3 विद्यार्थ्यांना ही प्रवेशाची शक्यता आहे.गेल्या वर्षी सृष्टी नरसाळे या विद्यार्थीनीची याच शाळेतून नवोदयसाठी निवड झाली आहे.
जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाबासाहेब तांबे आणि सरपंच सौ.सुमन तांबे यांचे शाळेकडे खूप बारकाईने लक्ष असते, त्याचा आम्हाला लागेल त्या मदती सोबतच खूप मानसिक आधार आणि काम करण्यासाठी प्रेरणादायी पाठिंबा नेहमी असतो.त्यांच्याकडून वेळोवेळी होणारे चांगल्या कामाचे कौतुक आम्हाला अजून नवी ऊर्जा आणि बळ देते.असे शिक्षक दाम्पत्याने या वेळी बोलताना सांगितले.समर्थ खूप चाणाक्ष आणि तल्लख बुद्धीचा मूलगा आहे,त्याचे भविष्य उज्ज्वल आहे,त्याची आई नम्रता अंगणवाडी मदतनीस तर वडील बाळासाहेब केश कर्तनाचा व्यवसाय करतात,त्यांची समर्थच्या शाळेबाबत असणारी जागरूकता विलक्षण आहे.त्याच्या यशाबद्दल पालकांनी कृतज्ञता व्यक्त केली.

समर्थचे माजी सभापती बाबासाहेब तांबे,माजी सरपंच राजाराम नरसाळे,उपसरपंच पै.दादाभाऊ नरसाळे सर्व पदाधिकारी यांनी विशेष कौतुक केले.श्री.बाबासाहेब तांबे मित्र मंडळ आणि आरोग्य शिक्षण पर्यावरणात काम करणाऱ्या दिशा फाऊंडेशन कडूनही समर्थचा सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष संदीप तांबे यांनी दिली.समर्थवर संपूर्ण गावातून ग्रामस्थ,विविध संस्था कडून कौतूकाचा वर्षाव होत आहे.