Take a fresh look at your lifestyle.

ईश्वरी गुणांचा दुरोपयोग संकटात टाकतो !

ज्याला समज येते तो उतमात करीत नाही.

 

सुंदर गळा लाभलेली व्यक्ती गायक बनते, विशेष दृष्टी लाभलेली व्यक्ती निसर्ग अभ्यासक किंवा कोणत्याही विषयात प्राविण्य मिळवते.सुंदर हस्ताक्षर लेखक बनवते,चाणाक्ष बुद्धी विचारवंत बनवते.बोलण्याची कला उत्तम वक्ता बनवते.हे झालं उदाहरणादाखल. जन्मजात मिळालेल्या गुणांना प्रयत्नाची जोड विषेशत्व प्राप्त करुन देते.
शरीरासोबत मिळालेल्या खास गुणांमुळे आपण गर्व करावा हा बालिशपणा ठरेल.सुंदर शरीर लाभणे ही ईश्वर देणगी आहे त्याच्या जोरावर गुणगौरव मिळवणं यात भलेपण आहे. पण त्यामुळे दुसऱ्याला हिन लेखणं,दुसऱ्याच्या खुजेपणावर टिकाटिप्पणी करणं केवळ मुर्खपणाचं ठरेल.गळा गोड आहे पण त्या गोड गळ्याने आनंद देणारीभावगीतं,भक्तीगीतं,देशभक्ती गीतं गाता येणं भाग्याचं आणि विशेषत्व सिद्ध करणारं आहे,पण शिव्या देण्यासाठी, पान उतारा करण्यासाठी,अश्लील गीतं गाण्याची त्याचा उपयोग करावा वाटणं म्हणजे अवधसा सुचण्यासारखं आहे. अशी इच्छा होणं हा त्या देणगीचा अपमान आहे.
तिक्ष बुद्धी लाभल्याने व्यावसायवृद्धी करणे,समाजकल्याणकारी कार्यात त्याचा उपयोग करणं ही त्या सदगुणांची पुजा आहे. पण त्या बुद्धीचा वापर समाजाला वेठीस धरण्यासाठी करणं,दुसऱ्याचे प्रपंच मोडण्यासाठी करणं म्हणजे महत्पाप.यामुळे आयुष्यात कधीतरी त्याचं फळ भोगावच लागतं कारण कोणतीही गोष्ट वयाबरोबर नष्ट होत असते.चांगली वागणारी माणसं सुद्धा वयपरत्वे विक्षिप्त वागतात.वाईट वागणारांना वयपरत्वे कसं जीवन प्राप्त होतं यावर न बोललेलच बरं.
निती नावाची ईश्वराची अदृष्य व्यवस्था अव्याहतपणे काम करत असते.नितीचं गिऱ्हाईक आम्ही होऊ नये.आम्ही परामायेत अडकणार नाही याची दक्षता घ्यायला हवी.डोळ्यांना दिसणारी माया जी आम्हाला मोहात पाडते. ती ‘अपरामाया’ आणि न दिसणारी अदृष्य कौशल्य म्हणजे कल्प,विकल्प,एखादी क्रिया पुर्णत्वास नेण्यासाठी केलेली विचार बुद्धी म्हणजे ‘परामाया’ आहे.त्यात अडकलं की मग ती आम्हाला निषिध्द कर्म करण्यास भाग पाडते.परामाया म्हणजे डोळ्यांना न दिसणारी शक्ती.आमच्यात बाह्यांगाने न दिसणारी कौशल्य म्हणजे परामाया.
एका युवक अत्यंत वेगाने कोणत्याही भिंतीवर चढु शकत होता.त्या कलेमुळे त्याला अनेक बक्षिसं,पुरस्कार, मानसन्मान मिळत होता.त्याची ही कला एका चोराने हेरली.तो त्याला भेटला आणि त्याला मोठ्या रकमेचं अमिष दाखवून एका उंच बिल्डिंगमधे चोरी करण्यास तयार केले.त्यालाही मोठ्या रकमेची अपेक्षा लागली.मग त्याने ठरलेल्या रात्री सफाईदारपणे त्या बिल्डिंगवर चढुन दागिन्यांची चोरी केली.खाली उभ्या असलेल्या चोराच्या हातात ते गाठोडे दिले.ठरलेली रक्कम उद्या देतो म्हणून चोर गाठोडे घेऊन गेला.दुसऱ्या दिवशी हा युवक ठरलेली रक्कम मागण्यांसाठी गेल्यावर त्या चोराने त्याला हाकलून लावले.वरुन म्हणाला तु चोरी केलेली मी पोलिसांत कळवले तर जेलमधेच सडशील.चल चालता हो.युवक चुपचाप हात हलवत निघून गेला.
या गोष्टीतुन काय बोध घ्याल आपण?
ईश्वरकृपेने त्याला पायांची विषेश देणगी लाभली होती,ही अपरामाया म्हणजे दिसणारी शक्ती.वास्तविक त्याचा उपयोग त्याने चांगल्या कार्मासाठी करणे अपेक्षित होते.पण स्वतःची बुद्धी त्याने गैरमार्गाने अवलंबली.चोरी करुन मोठी रक्कम मिळेल या मोहाने तो परामायेच्या तावडीत सापडला. अशी गत आमची अनेकदा होते.अपरामायेनं मिळालेलं शरीर सामर्थ्य मोहामुळे परामायेच्या ताब्यात देतो आणि आपला विनाश ओढावुन घेतो.आपण सतत दक्ष राहिलं तर दोहोंचा संगम साधुन सद्विवेक जागृत ठेवून या शक्तिच्या बळावर आम्ही स्वतःचं खास अस्तित्व निर्माण करु शकतो.मग अगदी मृत्युही त्याला धक्का लावु शकणार नाही.
रामकृष्णहरी